पुण्यात बुधवारी भरदुपारी शिवाजीनगर न्यायालयाच्या गेट नंबर 4 बाहेर गोळीबार आणि कोयता हल्ल्याचा थरार घडला. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण पुण्यात खळबळ उडाली असून, कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेची गंभीर दखल घेत राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली असून, आरोपींना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, असा सज्जड दम दिला आहे.
आरोपींना पाठीशी घातले जाणार नाही
शिवाजीनगर न्यायालयाबाहेर घडलेली गोळीबार आणि कोयत्याने हल्ला केल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर असल्याचे सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे. या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध युद्धपातळीवर सुरू असून, दोषींना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणेला अधिक सतर्क आणि कठोर राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. पुणेकरांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली आहे.
अवैध शस्त्रांवर कठोर कारवाई, गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्त वाढणार
यापुढे शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर करडी नजर ठेवणे आणि शहरातील गर्दीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यावर विशेष भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. आज दुपारी सव्वाच्या सुमारास शिवाजीनगर न्यायालयाच्या गेट नंबर 4 जवळ हा रक्तरंजित थरार घडला. कात्रज भागातील रहिवासी असलेला मंदार किवळे हा कोर्टातील सुनावणी आटोपून गेट नंबर 4 बाहेर आला असता, दोन दुचाकीवरून आलेल्या सहा हल्लेखोरांनी त्याला घेरले. हल्लेखोरांनी आधी त्याच्यावर पिस्तुलातून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर हातातील कोयत्यांनी त्याच्यावर जीवघेणे वार केले. भर गर्दीत झालेल्या या हल्ल्यामुळे न्यायालय परिसरात मोठा गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. या हल्ल्यात मंदार किवळे गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यामागे जुनी पार्श्वभूमी आणि वैमनस्य असल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, या घटनेतील हल्लेखोरांची ओळख पटली असल्याची माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे. फरार आरोपींच्या शोधासाठी पुणे पोलिसांची 8 ते 10 विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. मात्र, न्यायालयासारख्या अतिसंवेदनशील परिसरात शस्त्रे घेऊन येण्याची हिंमत हल्लेखोरांमध्ये निर्माण होतेच कशी, असा सवाल आता पुणेकर उपस्थित करत आहेत.
प्रतिक्रिया व्यक्त करा