दादर आणि माहीम चौपाटीवर कबुतरांना दाणे टाकणाऱ्यांवर आता मुंबई महापालिका दंडात्मक कारवाई करणार आहे. चौपाटीलगतच्या इमारतींमध्ये कबुतरांचा वावर वाढल्याने अस्वच्छता, दुर्गंधी आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होत असल्याच्या तक्रारी स्थानिक रहिवाशांनी पालिकेकडे केल्या आहेत. त्यानंतर जी उत्तर वॉर्डने ही कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही चौपाट्यांवर कर्मचारी तैनात केले जाणार असून, नियमावलीचे फलकही लावले जाणार आहेत.
मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना दाणे टाकण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र दादर येथील कबुतरखाना बंद झाल्यानंतर काही नागरिकांनी चौपाट्यांचा पर्याय निवडल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये दादर कबुतरखाना बंद झाल्यानंतर चौपाटी परिसरात कबुतरांची संख्या वाढली, असा दावा रहिवाशांनी केला आहे.
न्यायालयीन निर्बंध असतानाही पर्यटक तसेच काही नागरिकांकडून चौपाटीवर उघडपणे कबुतरांना दाणे टाकले जात असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. काही जण मोठ्या गोण्यांमध्ये धान्य घेऊन चौपाटीवर येतात. त्यांना विरोध करूनही हा प्रकार थांबत नसल्याने रहिवाशांमध्ये नाराजी आहे. कबुतरखान्यांवरील निर्बंध केवळ कागदावर न राहता चौपाटी परिसरातही कठोरपणे लागू करावेत, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
सकाळ-संध्याकाळ कर्मचारी तैनात राहणार
या पार्श्वभूमीवर दादर आणि माहीम चौपाटीवर मनुष्यबळ तैनात करून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती जी उत्तर वॉर्डचे सहायक आयुक्त योगेश देसाई यांनी दिली. दोन्ही चौपाट्यांवर सकाळी नऊ ते अकरा आणि दुपारी चारनंतर दोन ते तीन तास कर्मचारी तैनात असतील. कबुतरांना दाणे टाकणाऱ्यांकडून पाचशे रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे.
दादर कबुतरखान्याला नवे रूप
दरम्यान, दादर कबुतरखान्याला नवे स्वरूप देण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. ताडपत्रीऐवजी कबुतरखाना पारदर्शक अॅक्रेलिक शीटने झाकण्यात आला आहे. आतील कारंजे सुरू करण्यासाठी वारसा विभागाशी पत्रव्यवहार सुरू असून, आकर्षक रोषणाईचीही चाचपणी सुरू आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा