शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्याची तयारी करणाऱ्या आमदार रोहित पवार यांना त्यांच्याच पक्षातून मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आज झालेल्या बैठकीत जिल्हा प्रमुखांना मोर्चात सहभागी होण्याबाबत कोणत्याही थेट सूचना देण्यात आल्या नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
पत्रकार परिषदेत दावा, बैठकीत मात्र वेगळे चित्र
गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार यांच्या मोर्चाला त्यांच्याच पक्षाचा पाठिंबा नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. या पार्श्वभूमीवर बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी आपल्या आंदोलनाला पक्षाचा पूर्ण पाठिंबा असल्याचा दावा केला होता. पक्षातील सर्व बडे नेते या मोर्चात सहभागी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता. मात्र आज पक्ष कार्यालयात झालेल्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीतून वेगळीच माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बैठकीत मोर्चात सहभागी व्हावे की नाही, याबाबत जिल्हा प्रमुखांना कोणत्याही थेट सूचना देण्यात आल्या नाहीत. त्यामुळेच रोहित पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
दुष्काळावर चर्चा; सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेण्याच्या सूचना
आजच्या बैठकीत दुष्काळाच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा झाली. राज्यात सर्वत्र दुष्काळाची परिस्थिती असल्याने त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सज्ज राहावे, अशा सूचना देण्यात आल्या. दुष्काळाच्या मुद्द्यावर काम करताना सरकारविरोधात आक्रमक भूमिका घ्यावी, सरकारच्या योजनांची अंमलबजावणी होते की नाही यावर लक्ष ठेवावे आणि स्थानिक पातळीवर प्रशासनावर दबाव ठेवत जनतेच्या हिताचा विचार करावा, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या. नागपूर अधिवेशनादरम्यान रोहित पवार काढणार असलेल्या मोर्चाबाबत पक्षाची अधिकृत भूमिका काय असेल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा