माजी रेल्वे मंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव, त्यांची पत्नी राबडी देवी आणि मुलगा तेजस्वी यादव यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिका फेटाळून लावण्यात आल्या आहेत. त्यांनी आयआरसीटीसी प्रकरणाशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात राऊज एव्हेन्यू कोर्टाकडून आरोप निश्चितीच्या दिलेल्या आदेशाला याचिकांद्वारे आव्हान दिलं होतं. न्यायमूर्ती स्वर्णा कांता शर्मा यांच्या खंडपीठाने या याचिका फेटाळून लावतानाच आरोप निश्चितीचा आदेश कायम ठेवला आहे. या प्रकरणात अन्य आरोपींच्या याचिकाही कोर्टाने फेटाळल्या आहेत.
हायकोर्टाने काय म्हटलं
दिल्ली हायकोर्टाने लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबाने दाखल केलेल्या याचिका फेटाळल्या. राऊज एव्हेन्यू कोर्टाने आरोप निश्चितीचा दिलेला आदेश कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आता राऊज एव्हेन्यू कोर्टात या प्रकरणात सुनावणी सुरूच राहणार आहे.
प्रकरणाची पार्श्वभूमी
राऊज एव्हेन्यूच्या विशेष कोर्टाने १३ ऑक्टोबर २०२५ रोजी लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबातील सदस्यांसह एकूण १४ आरोपींच्या विरोधात आरोप निश्चित केले होते. या सर्व आरोपींवर फसवणूक आणि गुन्हेगारी कटाचे आरोप करण्यात आले होते. याशिवाय भ्रष्टाचारविरोधी कायद्यांतर्गत अनेक कलमान्वये आरोप निश्चित केले होते. रेल्वेच्या रांची आणि पुरी येथील हॉटेलांच्या निविदा आणि जमिनींच्या व्यवहारात अनियमितता झाली होती, असा आरोप सीबीआयकडून करण्यात आला होता. याआधी दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू कोर्टाने आयआरसीटीसी मनी लाँड्रिंग प्रकरणात लालू प्रसाद यादव, तेजस्वी यादव, राबडी देवी यांच्यासह एकूण ९ आरोपींच्या विरोधात आरोप निश्चित केले होते. तर इतर सात आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आलं होतं. या प्रकरणात लालू प्रसाद यांची भूमिकाही संशयास्पद आहे, असं कोर्टाचं म्हणणं होतं.
प्रतिक्रिया व्यक्त करा