मुंबईच्या फोर्ट परिसरातील एका दुकानाच्या नावाच्या पाटीवर बॉम्बे हा शब्द लिहिलेला दिसल्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यावर तीव्र आक्षेप घेतला. शहराचे अधिकृत नाव मुंबई असताना जुन्या नावाचा वापर का केला जातो, असा प्रश्न उपस्थित करत मनसेच्या कार्यकर्त्यांनी दुकानावर थेट मुंबई लिहिलेले पोस्टर लावले. या प्रकारामुळे फोर्ट परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दुकान मालकाने जाणूनबुजून बॉम्बे हा शब्द वापरल्याचा आरोप मनसेने केला आहे. स्वातंत्र्यानंतर आणि शहराचे नामकरण मुंबई असे झाल्यानंतरही काही व्यावसायिक जुनाच उल्लेख वापरत असल्याबद्दल पक्षाने नाराजी व्यक्त केली आहे.
कार्यकर्त्यांनी लावले मुंबईचे पोस्टर
मनसेच्या कार्यकर्त्यांनी दुकानाच्या पाटीवरील बॉम्बे या शब्दावर मुंबई असे लिहिलेले पोस्टर चिकटवले. दुकान मालकाला यापुढे बॉम्बे ऐवजी मुंबई हाच शब्द वापरावा, अशी सक्ती करण्यात आली. भविष्यात पुन्हा असा प्रकार घडल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही मनसेने दिला आहे.
नामकरणाच्या मुद्द्यावर पुन्हा चर्चा
या घटनेमुळे मुंबईच्या नामकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शहराचे नाव मुंबई असतानाही काही ठिकाणी जुना उल्लेख दिसून येतो आणि त्यावरून वेळोवेळी वाद निर्माण होतात.
प्रतिक्रिया व्यक्त करा