मुंबईतील माहीम परिसरात एका सोन्याच्या दुकानावर गोळीबार झाल्याची घटना घडली. पी. सी. जैन ज्वेलर्स या दुकानावर हा गोळीबार झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच माहीम पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गोळीबार नेमका का झाला आणि त्यामागे कोणाचा हात आहे, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास तातडीने सुरू केला आहे.
पुण्यातील घटनेनंतर काही तासांतच मुंबईत गोळीबार
याच दिवशी दुपारी पुण्यातही गोळीबाराची धक्कादायक घटना घडली होती. शिवाजीनगर न्यायालयाच्या गेट क्रमांक ४ बाहेर भरदुपारी गोळीबार आणि कोयत्याने हल्ला करण्याची घटना घडली. कात्रज भागातील रहिवासी मंदार किवळे हे न्यायालयातील सुनावणी आटोपून गेट क्रमांक ४ बाहेर आले असता दोन दुचाकीवरून आलेल्या सहा हल्लेखोरांनी त्यांना घेरले. हल्लेखोरांनी आधी पिस्तुलातून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर कोयत्यांनी त्यांच्यावर जीवघेणे वार केले. भर गर्दीत झालेल्या या हल्ल्यामुळे न्यायालय परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या हल्ल्यात मंदार किवळे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दोन्ही घटनांमुळे राज्यभरात खळबळ
बुधवारी दुपारी पुण्यात आणि संध्याकाळी मुंबईत अशा दोन्ही ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. माहीममधील घटनेत कोणीही जखमी झाले नसले तरी दुकानावर गोळीबार झाल्याने व्यापारी आणि स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिस दोन्ही घटनांचा तपास करत आहेत.
प्रतिक्रिया व्यक्त करा