पुण्यात शिवाजीनगर न्यायालयाबाहेर बुधवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास दिवसाढवळ्या गोळीबार आणि कोयत्याने हल्ल्याची घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरलं असताना त्याच दिवशी संध्याकाळी मुंबईतही गोळीबाराची घटना घडली. माहीममध्ये शोभा हॉटेलच्या जवळ असलेल्या एका ज्वेलर्सच्या दुकानावर गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
गोळीबार करणारे अज्ञात हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. या गोळीबारात सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. मात्र गोळीबाराचा उद्देश नेमका काय होता, याचा तपास आता पोलीस करत आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
खंडणीच्या वादातून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न?
दुचाकीवरून आलेल्या दोन हेल्मेट परिधान केलेल्या व्यक्तींनी ज्वेलर्सवर गोळीबार करून पळ काढल्याची माहिती आहे. प्राथमिक माहितीनुसार, खंडणीच्या वादातून दहशत निर्माण करण्याच्या हेतूने तीन गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेत ज्वेलर्सचा मालक थोडक्यात बचावला. दुकानाच्या पुढच्या भागातील काच मात्र तुटली.
घटना घडली तो परिसर अत्यंत रहदारीचा आहे. शोभा हॉटेलच्या बाजूला चार रस्ता असल्याने हा परिसर महत्त्वाचा मानला जातो. संध्याकाळच्या वेळी तिथे ये-जा करणाऱ्यांची मोठी गर्दी असते आणि मोठी वस्तीही आहे. भर वस्तीत ही घटना घडल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी
घटनेचं गांभीर्य ओळखून सहआयुक्त मनोजकुमार शर्मा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी करून तपास सुरू केला आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या गाडीवरही गोळीबार झाला होता. मुंबईत वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा