धाराशिव जिल्ह्यातील तेर गावातील धोंडाबाई या वृद्ध महिलेची जगण्यासाठीची धडपड समोर आली आहे. श्रावणबाळ योजनेचे अनुदान वेळेवर मिळत नाही आणि रेशनही मिळत नसल्याची तक्रार त्यांनी केली होती. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. त्यांचा मुलगाही काम करू शकत नाही, त्यामुळे महिलेची परिस्थिती अधिकच बिकट झाली होती.
या महिलेची व्यथा समोर आल्यानंतर धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी याची दखल घेतली आहे. या महिलेला आता अन्नधान्य मिळणार असून तिचे घरही दुरुस्त केले जाणार असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली आहे.
महिलेची परिस्थिती बिकट असल्याने तिला दत्तक घेतल्याचे सरनाईक यांनी सांगितले. तिला अन्नधान्य मिळेल आणि घर दुरुस्त केले जाईल, असे त्यांनी सांगितले. याबाबत पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सहकार्य
राज्यात ३०८ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सर्व सहकार्य केले जाईल, असे सरनाईक म्हणाले. शासनाचे जसे आदेश आहेत, तसे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
बेकायदा दुचाकी सेवांवर कारवाई
रॅपिडो, ओला आणि उबर या कंपन्यांना दुचाकी सेवा चालवण्याची परवानगी दिलेली नाही, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले. ईव्ही दुचाकींना मात्र परवानगी देण्यात आली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अडचणी असतील किंवा सेवा बेकायदा असेल तर वाहने जप्त केली जातील, असे ते म्हणाले.
यासंदर्भात उद्या आरटीओ कार्यालयात बैठक लावण्यात आली असून कंपन्यांना लेखी सूचना देण्यात आल्या आहेत. पुण्यात कारवाई सुरू असून भविष्यात राज्यभरात कारवाई सुरू राहील, असेही सरनाईक म्हणाले. शासनाला खिशात घेऊ, असे या कंपन्यांना वाटत असेल तर तसे होणार नाही; त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
महिलेची व्यथा समोर आल्यानंतर प्रशासनही खडबडून जागे झाले असून अन्नधान्याचा प्रश्न आणि विविध योजनांच्या लाभासंदर्भातील प्रश्नांची दखल घेण्यात आली आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा