पुणे न्यायालयाबाहेर धक्कादायक घटना घडली आहे. न्यायालयाच्या गेट क्रमांक चार परिसरात दोन हल्लेखोरांनी एका व्यक्तीवर गोळीबार करत कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. या घटनेमुळे पुणे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या हातांना गंभीर दुखापत झाल्याचे सांगितले जात आहे.
फॅमिली कोर्टापर्यंत पाठलाग करून हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबारानंतर हल्लेखोरांनी पीडित व्यक्तीचा पाठलाग केला आणि फॅमिली कोर्टापर्यंत त्याला कोयत्याने मारहाण केली. न्यायालय परिसरातच अशी घटना घडल्याने उपस्थितांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. जखमी व्यक्तीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलिसांचा तपास सुरू, कोयता गँगवर प्रश्नचिन्ह
यापूर्वीही पुण्यात कोयता गँगची दहशत समोर आली होती. या घटनेमुळे पोलिसांकडून कोयता गँग शहरात अस्तित्वात नसल्याचा दावा पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, पंचनामा करण्यात येत आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला की गँगवॉरमुळे, याचा तपास पोलीस करत आहेत. न्यायालयासारख्या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या परिसरात घडलेल्या या घटनेने शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
Leave a Reply