मुंबईतील माहीम परिसरातील एका सोन्याच्या दुकानावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. याच दिवशी दुपारी पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाबाहेरही गोळीबार आणि जीवघेण्या हल्ल्याची घटना घडली होती. एकाच दिवशी राज्यातील दोन प्रमुख शहरांमध्ये घडलेल्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दुकानावर गोळीबार, कोणीही जखमी नाही
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळच्या सुमारास माहीम येथील पी. सी. जैन ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानाला लक्ष्य करून गोळीबार करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने या हल्ल्यात कोणालाही दुखापत झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच माहीम पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, परिसरात तपास सुरू करण्यात आला आहे. सोन्याच्या दुकानावर गोळीबार करण्यामागे नेमका काय उद्देश होता, हल्लेखोर कोण होते आणि त्यांनी दुकानालाच लक्ष्य का केले, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयितांची माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पुण्यात न्यायालयाबाहेर हल्ला
याच दिवशी दुपारी पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाच्या गेट नंबर ४ जवळही गोळीबार आणि जीवघेण्या हल्ल्याची घटना घडली होती. कात्रज येथील रहिवासी मंदार किवळे हे न्यायालयातील सुनावणी संपवून बाहेर पडत असताना दुचाकींवरून आलेल्या सहा हल्लेखोरांनी त्यांना घेरले. हल्लेखोरांनी त्यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कोयत्याने त्यांच्यावर सपासप वार करण्यात आले. न्यायालयाच्या गेटबाहेर भर गर्दीत झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात प्रचंड घबराट पसरली होती. या हल्ल्यात मंदार किवळे गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात पाच जणांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यात दिवसाढवळ्या न्यायालय परिसरात झालेला हल्ला आणि त्यानंतर मुंबईतील माहीममध्ये सोन्याच्या दुकानावर झालेला गोळीबार या सलग घटनांमुळे गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा