सौरमालिकेतील पाहण्यास सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या दूरवरच्या बर्फाळ महाग्रहांपैकी एक असलेला युरेनस बुधवारी, २५ नोव्हेंबर रोजी आपल्या वार्षिक ‘अपोजिशन’ स्थितीत पोहोचला. अपोजिशन म्हणजे ग्रह सूर्याच्या अगदी विरुद्ध बाजूस येणे. ‘बीव्हर सुपरमून’नंतर अवघ्या एका दिवसात ही खगोलीय घटना घडली. सूर्यापासून सातव्या क्रमांकावर असलेल्या या ग्रहाला पाहण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे, मात्र तो शोधण्यासाठी स्टारगेझिंग दुर्बीण किंवा चांगल्या दर्जाची दुर्बीण वापरणे आवश्यक ठरेल.
अपोजिशन म्हणजे काय?
युरेनस हा ग्रह अंधुक आणि संथ गतीने फिरणारा असल्याने सर्वसामान्य खगोलप्रेमींकडून त्याकडे क्वचितच लक्ष दिले जाते. मात्र, २५ नोव्हेंबरनंतर पुढील काही आठवड्यांत तो या वर्षातील पृथ्वीच्या सर्वात जवळच्या अंतरावर असेल आणि सर्वात तेजस्वी दिसेल, ज्यामुळे त्याचे दर्शन घेणे शक्य होणार आहे. पृथ्वी जेव्हा युरेनस आणि सूर्य यांच्यामधून जाते, तेव्हा युरेनस सूर्याच्या ‘विरुद्ध’ दिशेला येतो; यालाच ‘अपोजिशन’ म्हणतात.
‘अर्थस्काय’च्या माहितीनुसार, अपोजिशनचा नेमका क्षण २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता (पूर्व अमेरिकन वेळेनुसार) आला. त्यामुळे युरेनस सूर्यास्ताच्या सुमारास पूर्वेला उगवेल, मध्यरात्रीच्या सुमारास आकाशात सर्वोच्च बिंदूवर पोहोचेल आणि सूर्योदयाच्या सुमारास पश्चिमेला मावळेल. त्यामुळे रात्रभर तो आकाशात दिसू शकेल.
कुठे आणि कसा शोधाल?
हा ग्रह वृषभ तारकासमूहात, ‘प्लेअडीज’ या मुक्त तारागुच्छाजवळ दिसेल. या तारागुच्छाला ‘सेव्हन सिस्टर्स’ किंवा ‘एम ४५’ असेही ओळखले जाते. प्लेअडीज तारागुच्छाच्या आग्नेयेला काही अंशांवर, प्लेअडीज आणि वृषभ तारकासमूहातील सर्वात तेजस्वी तारा ‘अल्डेबारन’ यांच्यातील अंदाजे दोन-पंचमांश अंतरावर युरेनस एका अंधुक प्रकाशबिंदूसारखा दिसेल.
युरेनसची दृश्यप्रत +५.६ इतकी असून, अत्यंत गडद आकाशात तो तांत्रिकदृष्ट्या उघड्या डोळ्यांनीही दिसू शकतो. मात्र, शहरातील प्रकाशप्रदूषणामुळे तो शोधणे अवघड जाते. त्यामुळे गडद आकाश असलेल्या ठिकाणी चांगल्या दुर्बिणीच्या साहाय्याने त्याचे निरीक्षण करणे अधिक योग्य ठरेल. पुढील काही आठवडे खगोलप्रेमींसाठी ही दुर्मीळ संधी आहे. या काळात ग्रहाचे निरीक्षण करण्यासाठी गडद आकाश आणि चांगली दुर्बीण उपयुक्त ठरते.
प्रतिक्रिया व्यक्त करा