आषाढी आणि कार्तिकी एकादशी म्हटली की पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. यानिमित्त तिथल्या बाजारपेठाही विविध वस्तूंनी फुललेल्या दिसतात. मात्र यंदाचे चित्र काहीसे वेगळे आहे. यंदा दुष्काळाच्या झळा कार्तिकी यात्रेलाही बसल्या असून पंढरपूरच्या बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे.
कार्तिकी यात्रेला १० ते १५ लाख भाविक येतील, या अपेक्षेने व्यापाऱ्यांनी लाखो रुपयांचे प्रासादिक साहित्य, विठ्ठल-रुक्मिणीच्या फायबरच्या मूर्ती, आकर्षक फोटो, तुळशीमाळा आणि पितळी मूर्तींचा साठा केला होता. मात्र यंदा भाविकांची संख्या निम्म्यापेक्षा अधिक घटल्याने मंदिर परिसरातील बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळत आहे. अनेक व्यापाऱ्यांची उलाढाल केवळ ३० टक्क्यांवर आल्याने लहान-मोठे व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत.
यात्राकाळातील उलाढाल कोसळली
कार्तिकी यात्रेदरम्यान मंदिर परिसरातील बाजारपेठेत हळद, कुंकू, बुक्का, अष्टगंध, चुरमुरे, प्रसाद, पेढे, तुळशीमाळा, विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्ती आणि देवतांचे फोटो यांची मोठी विक्री होते. या बाजारपेठेतून यात्राकाळात साधारण ८ ते १० कोटी रुपयांची उलाढाल होते. मात्र यंदा दुष्काळामुळे शेतकरी आणि वारकऱ्यांच्या हातात पैसा नसल्याने खरेदीकडे भाविकांनी पाठ फिरवली आहे.
व्यापारी राजू शिंदे यांनी सांगितले की, दरवर्षी यात्रेच्या एका दिवसात ५ ते ७ लाख रुपयांची उलाढाल होते. यंदा मात्र ती घसरून २ ते ३ लाख रुपयांवर आली आहे. नामदेव पायरीसमोरील पेढ्यांच्या प्रसिद्ध दुकानांमध्येही विक्रीत मोठी घट झाली आहे. एका दिवसात १२ ते १४ लाख रुपयांचे पेढे विकले जात असताना यंदा अपेक्षित विक्री झालेली नाही.
छोट्या व्यापाऱ्यांनाही मोठा फटका
मंदिर परिसरातील तुळशीमाळ विक्रेत्यांनाही याचा मोठा फटका बसला आहे. तयार केलेल्या माळांचा साठा विक्रीअभावी पडून असल्याचे व्यापारी गंगेकर यांनी सांगितले. दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या खिशात पैसा नसल्याने त्याचा परिणाम आमच्यासारख्या लहान-मोठ्या व्यापाऱ्यांवर होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
एकूणच, यंदा दुष्काळाचा फटका केवळ शेतकऱ्यांपुरता मर्यादित न राहता कार्तिकीसारख्या मोठ्या यात्रेतील व्यापारी आणि शहराच्या अर्थव्यवस्थेलाही बसला आहे. वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येत असले तरी आर्थिक परिस्थितीमुळे खरेदी टाळत असल्याचे चित्र बाजारपेठेत दिसत आहे.
Leave a Reply