काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘बिलाँगिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक लिखाण असल्याचा आरोप करत सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी गांधी यांना नोटीस पाठवली आहे. या नोटिशीला १५ दिवसांत उत्तर न दिल्यास न्यायालयात मानहानीची याचिका दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
सात्यकी यांनी सोनिया गांधी यांच्या दिल्लीतील १० जनपथ या निवासस्थानी टपालाद्वारे नोटीस पाठवली असून, ईमेलद्वारेही नोटीस बजावण्यात आली आहे. ही माहिती सावरकर यांचे वकील संग्राम कोल्हटकर यांनी दिली.
नोटिशीत नेमके काय म्हटले आहे?
वकिलांच्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांच्या पुस्तकातील पान क्रमांक २०१ आणि ४४३ वर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक लिखाण केल्याचे निदर्शनास आले आहे. नोटिशीत नमूद आहे की, स्वातंत्र्यसंग्रामात जेव्हा काँग्रेसचे कार्यकर्ते ब्रिटिशांच्या लाठी-काठ्या खात होते, त्या वेळी सावरकर हे ब्रिटिशांसाठी हेरगिरी करत होते आणि त्यांनी ब्रिटिशांना मदत केली. तसेच भारतात हिंदू धर्म श्रेष्ठ असून, अन्य धर्मीय कनिष्ठ आहेत, असा उल्लेख गांधी यांनी पुस्तकात केला असल्याचेही नोटिशीत म्हटले आहे.
शिवसेनेकडून पुस्तक फाडून निषेध
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत पत्रकार परिषद घेत सोनिया गांधी यांच्या पुस्तकाचा निषेध केला होता. प्रवक्ते शीतल म्हात्रे, संजय निरुपम, शायना एनसी आणि आनंद दुबे यांच्यासह सहा प्रवक्त्यांनी पत्रकार परिषदेत पुस्तकाची काही पाने फाडली. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सोनिया गांधी यांनी अपमान केल्याचा आरोप करत त्यांनी पुस्तकावर बंदीची मागणीही केली होती. यावेळी बोलताना शीतल म्हात्रे यांनी म्हटले होते की, सोनिया गांधी यांनी पुस्तकात सावरकर ब्रिटिश सरकारकडे सातत्याने माफीची विनंती करत होते, असा उल्लेख केला आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा