त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आकर्षक दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. मंदिरात हजारो दिव्यांची मनमोहक आरास करण्यात आली असून, संपूर्ण मंदिर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघालं आहे.
विशेष म्हणजे, यानिमित्ताने बाप्पाला तब्बल ४५१ विविध अन्नपदार्थांचा नैवेद्य दाखवण्यात आला आहे. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात गोड आणि तिखट अशा विविध पदार्थांची आकर्षक मांडणी करण्यात आली आहे.
४५१ पदार्थांचा महाभोग
या नैवेद्यात मिरचीपासून बेसनाच्या लाडूंपर्यंत, बाकरवडी आणि मोदकांसह शेकडो खाद्यपदार्थांचा समावेश आहे. गोड आणि तिखट पदार्थांच्या या मांडणीमुळे गाभाऱ्याचं रूप अधिकच देखणं झालं आहे.
भाविकांची मोठी गर्दी
दिव्यांच्या लखलखाटात आणि ४५१ पदार्थांच्या महाभोगामुळे मंदिराचं वातावरण भक्तिमय झालं आहे. हा नेत्रदीपक दीपोत्सव आणि बाप्पाचा महाभोग पाहण्यासाठी भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली आहे. त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने साकारलेला हा दैदिप्यमान सोहळा भाविकांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरत आहे.
Leave a Reply