रगडा पॅटिस हा पावसाळा आणि हिवाळ्यात आवडीने खाल्ला जाणारा एक लोकप्रिय स्ट्रीट फूड पदार्थ आहे. कुरकुरीत बटाट्याची पॅटिस, मऊ शिजवलेला मटाराचा रगडा, कांदा, शेव आणि चटण्या यामुळे त्याची चव आणखी खुलते. अनेक ठिकाणी मिळणारा हा चटपटीत पदार्थ खवय्यांना नेहमीच भुरळ घालतो. आता बाहेर जाण्याची गरज नाही, कारण प्रसिद्ध शेफ रणवीर ब्रार यांनी सांगितलेल्या पद्धतीने हा पदार्थ घरीच सहज बनवता येतो.
पॅटिससाठी लागणारे साहित्य
पॅटिस बनवण्यासाठी तीन मध्यम आकाराचे उकडलेले आणि किसलेले बटाटे, चवीनुसार मीठ, एक चमचा लसूण-हिरवी मिरची पेस्ट आणि कडा काढलेले तीन पांढऱ्या ब्रेडचे तुकडे लागतात. तळण्यासाठी आवश्यकतेनुसार तेल घ्यावे.
रगड्यासाठी लागणारे साहित्य
रगड्यासाठी दोन कप पांढरे वाटाणे, मीठ, हळद पावडर आणि आवश्यकतेनुसार पाणी लागते. याशिवाय वाढताना चार मोठे चमचे हिरवी चटणी, आंबट-गोड चटणी, पाव छोटा चमचा लाल तिखट, अर्धा कप बारीक चिरलेला कांदा, पाव कप बारीक चिरलेला टोमॅटो, एक चिरलेली ताजी हिरवी मिरची, अर्धा छोटा चमचा सुकी लसूण चटणी, एक मोठा चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर, दोन मोठे चमचे शेव, पाव छोटा चमचा भाजलेले जिरे पावडर, पाव छोटा चमचा चाट मसाला, पाव कप डाळिंबाचे दाणे आणि लिंबाच्या फोडी लागतात.
पॅटिस आणि रगडा बनवण्याची कृती
सर्वप्रथम एका भांड्यात किसलेले बटाटे, मीठ, लसूण-हिरवी मिरची पेस्ट आणि ब्रेडचे तुकडे घेऊन ते व्यवस्थित एकत्र करावे आणि पाच ते दहा मिनिटे बाजूला ठेवावे. त्यानंतर या मिश्रणाच्या गोल टिक्की तयार कराव्यात. मिश्रण जास्त ओलसर असेल तर त्यात कॉर्न स्टार्च किंवा अरारूट मिसळता येते. तयार टिक्की दोन्ही बाजूंनी सोनेरी तपकिरी होईपर्यंत तेलात तळून बाजूला काढून ठेवाव्यात.
रगड्यासाठी एका पॅनमध्ये पाणी, हळद आणि मीठ घालून शिजवलेले पांढरे वाटाणे घालावेत आणि मिश्रणाला उकळी येऊ द्यावी. रगडा बनवताना जास्त पाणी घालू नये, कारण रगडा खूप घट्ट किंवा खूप पातळ असू नये.
रगडा पॅटिस वाढण्याची पद्धत
सर्व्हिंग प्लेटमध्ये प्रथम गरम रगडा घालावा आणि त्यावर थोडी हिरवी चटणी व आंबट-गोड चटणी घालावी. त्यानंतर मटाराच्या रगड्यावर तयार केलेल्या बटाट्याच्या पॅटिस ठेवाव्यात. त्यावर थोडे लाल तिखट, चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि सुकी लसूण चटणी घालावी. शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर, शेव, भाजलेले जिरे पावडर, चाट मसाला, डाळिंबाचे दाणे आणि लिंबाच्या फोडींनी सजवून तयार रगडा पॅटिस लगेच गरमागरम वाढावा.
Leave a Reply