ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर अलिबागमधील आदिवासींच्या जमिनी हडपल्याचा आरोप केला होता. या आरोपावर नार्वेकर यांनी राऊतांविरोधात मानहानीची नोटीस बजावण्याचा इशारा दिला होता. राऊत यांनी हे आव्हान स्वीकारत नोटीस पाठवाच, असं म्हटलं आहे. मी अजून काहीच उघडं केलं नाही, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.
वीस आदिवासी कुटुंबांचा आक्रोश ऐका
नार्वेकर यांनी शंभर टक्के नोटीस पाठवली पाहिजे, नोटीस पाठवणं गरजेचं आहे, असं राऊत म्हणाले. त्यांच्याशी माझं वैयक्तिक भांडण नाही, त्यांचे आणि माझे संबंध जवळचे आहेत, असं सांगतानाच वीस आदिवासींचा आक्रोश त्यांनी ऐकला पाहिजे, असं ते म्हणाले. वीस आदिवासींची घरे बुलडोझर लावून उद्ध्वस्त करण्यात आली. त्यांच्याकडे कुळ कायद्यानुसार कागदपत्रं आहेत आणि सरकारी योजनेतून त्यांची घरे बांधली होती, असं राऊत यांनी सांगितलं.
आदिवासींना चेंबरमध्ये बोलवा
अलिबागमधील आदिवासींनी काल प्रतिक्रिया देताना आमच्या जमिनी हडप केल्या नाहीत, असा दावा केला होता. यावर राऊत म्हणाले की, पैसे देऊन आमदार-खासदार विकत घेतले जातात, न्याय विकत मिळतो, तेव्हा त्यांच्या बाजूने बोलायला काय जातं? मात्र ज्या वीस आदिवासींची घरे उद्ध्वस्त झाली, त्यांच्याशी बोला, असं ते म्हणाले. विधानसभा अध्यक्षांनी या वीस आदिवासी कुटुंबांना आपल्या चेंबरमध्ये बोलवून त्यांचं म्हणणं ऐकावं आणि तक्रारीचं निवारण करावं, म्हणजे विषय संपेल, असं राऊत यांनी स्पष्ट केलं. या आदिवासींसाठी उल्का महाजन संघर्ष करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. चंद्रशेखर बावनकुळे हे विधानसभा अध्यक्षांची वकिली करत असल्याचा दावाही राऊत यांनी केला. कोर्टात जाण्याच्या धमक्या देऊ नका, अजून मी काहीच उघड केलं नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
Leave a Reply