आजकाल जवळपास प्रत्येकजण व्हॉट्सॲपचा वापर करतो. कार्यालयीन कामापासून ते वैयक्तिक संवादापर्यंत अनेक गोष्टींसाठी व्हॉट्सॲपचा वापर केला जातो. पण आता व्हॉट्सॲप वापरणाऱ्यांसाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा सायबर सुरक्षा इशारा दिला आहे. विशेषतः कार्यालयातील संगणक, सार्वजनिक संगणक किंवा इतरांच्या डिव्हाइसवर व्हॉट्सॲप वेब वापरणाऱ्यांनी जास्त काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कारण व्हॉट्सॲप वेब अकाउंट लॉगिन राहिल्यास सायबर गुन्हेगार त्याचा गैरवापर करू शकतात.
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटरच्या नॅशनल सायबरक्राइम थ्रेट अॅनालिटिक्स युनिटने यासंदर्भात सायबर सुरक्षा सूचना जारी केली आहे. त्यानुसार, एखाद्या व्यक्तीने तुमच्या व्हॉट्सॲप वेबच्या सक्रिय लॉगिन सेशनचा ताबा मिळवल्यास तुमचे खासगी मेसेज वाचता येऊ शकतात. इतकेच नाही तर तुमच्या नावाने इतरांना मेसेज पाठवणे, संपर्क यादी आणि गटातील संभाषण पाहणे, तसेच तुमच्या ओळखीचा वापर करून आर्थिक फसवणूक आणि फिशिंगचे प्रकार केले जाऊ शकतात.
व्हॉट्सॲप वेबमुळे अकाउंट हॅक होण्याचा धोका?
सूचनेत असे नमूद करण्यात आले आहे की, प्रमाणित व्हॉट्सॲप वेब सेशनचा काही परिस्थितीत गैरवापर करून वापरकर्त्याच्या व्हॉट्सॲप खात्यात अनधिकृत प्रवेश मिळवता येऊ शकतो. त्यामुळे व्हॉट्सॲप वेब वापरताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.
व्हॉट्सॲप वापरताना कोणती काळजी घ्यावी?
सायबर सुरक्षा सूचनेनुसार, व्हॉट्सॲप वापरताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. व्हॉट्सॲप वेबवरून सरकारी, आर्थिक किंवा संस्थेशी संबंधित संवेदनशील माहिती शेअर करू नका. काम झाल्यानंतर व्हॉट्सॲप वेबमधून स्वतः लॉगआउट करा. केवळ ब्राउझरची विंडो बंद केल्याने अकाउंट लॉगआउट होत नाही. सायबर कॅफे, हॉटेल किंवा इतर सार्वजनिक ठिकाणच्या संगणकावर व्हॉट्सॲप वेब वापरणे टाळा. गरज पडल्यास विश्वासार्ह संगणकावर इन्कॉग्निटो किंवा प्रायव्हेट ब्राउझिंग मोडचा वापर करा. त्यानंतरही लॉगआउट करा. व्हॉट्सॲपच्या सेटिंग्जमधील लिंक्ड डिव्हाइसेस पर्यायात जाऊन कोणते डिव्हाइस खात्याशी जोडलेले आहे, हे तपासा. अनोळखी डिव्हाइस दिसल्यास त्वरित लॉगआउट करा. मोबाईल, संगणक, ब्राउझर आणि सुरक्षा सॉफ्टवेअर नियमित अपडेट करा. अनोळखी फाइल्स डाउनलोड करणे टाळा.
Leave a Reply