मंगळवार, २४ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

अंबरनाथच्या अस्वच्छतेवरुन खासदार शिंदे संतप्त

अंबरनाथ शहरातील अस्वच्छतेवरून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आज संतप्त झाले. लोकार्पणावेळी त्यांनी मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांना भरसभेत दोनवेळा झापलं.

अंबरनाथच्या अस्वच्छतेवरुन खासदार शिंदे संतप्त

अंबरनाथ शहरातील अस्वच्छतेवरून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे चांगलेच भडकल्याचं चित्र आज पाहायला मिळालं. याच मुद्द्यावरून त्यांनी अंबरनाथ पालिकेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांना दोनवेळा भर सभेत झापल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अंबरनाथ पालिका मुख्याधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेवर खासदारांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

रस्त्यांच्या दोन्ही बाजूला घाण

नेताजी सुभाषचंद्र बोस स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या लोकार्पणासाठी आज खासदार श्रीकांत शिंदे अंबरनाथमध्ये आले होते. यावेळी उल्हासनगर शहरात रस्ते स्वच्छ होते, पण अंबरनाथमध्ये प्रवेश करताच रस्त्याच्या दोन्ही बाजूला घाण पडलेली होती, असं म्हणत त्यांनी मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांची चांगलीच खरडपट्टी काढली. अंबरनाथमध्ये आपण सिमेंटचे रस्ते बांधले आहेत. पण या रस्त्यांच्या दोन्ही बाजूला घाण आहे, असं म्हणत शहरात फिरत जा, असा उपरोधिक सल्ला त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिला.

नागरिकांना वॉटर, गटर, मीटर याच्यापालिकडे चांगल्या सुविधा आपण देत असून इतक्या मोठ्या प्रमाणात मोठे प्रकल्प होत असलेली अंबरनाथ ही एकमेव नगरपालिका आहे. मात्र हे होत असताना शहर स्वच्छ ठेवणं ही तुमची ड्युटी असून तुम्ही तुमचं काम केलं नाही, तर मला आणि नागरिकांना विरोधी पक्षाची भूमिका बजावावी लागेल, अशा शब्दांत त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना चांगलंच सुनावलं. मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्याकडे दोन चार्ज असल्यानं ते अंबरनाथला कमी येत असल्याची तक्रार अनेकदा समोर आली आहे. त्यामुळं आता खासदार श्रीकांत शिंदे हे या निमित्तानं शहराच्या हितासाठी काय निर्णय घेतात, हे आता पाहावं लागणार आहे.

नेताजी सुभाषचंद्र बोस स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं लोकार्पण

अंबरनाथमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं आज लोकार्पण करण्यात आलं. या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या रूपाने अंबरनाथकरांना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून इनडोअर आऊटडोअर खेळांसाठी सुसज्ज सुविधा उपलब्ध झाली असून यातून खेळाडूंना मोठा वाव मिळणार आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून सध्या खासदार क्रीडा संग्राम सुरू आहे. यातील ऍथलेटिक्स खेळांच्या स्पर्धा नवीन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये होतायत. याठिकाणी ४०० मीटरचा ऑलिम्पिक लेव्हल सिंथेटिक रनिंग ट्रॅक, फुटबॉल ग्राउंड, गोळाफेक, भालाफेक अशा ऍथलेटिक्सच्या इतर खेळांसाठी सुविधा आहेत. तर इनडोअर खेळांच्या सुविधाही लवकरच उपलब्ध होणार आहेत. याशिवाय समोरच असलेल्या शूटिंग रेंजमध्ये रायफल शूटिंगच्या स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेतून नवनवीन खेळाडू घडतील, यासोबतच स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधून शहरातील खेळाडूंना वाव मिळून खेळाडू देशपातळीवर शहराचं नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला. तसंच अशाप्रकारचे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स सर्वच शहरांमध्ये उभारण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance