मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील आता राज्यव्यापी दौरा करणार आहेत. ७ डिसेंबर ते २१ डिसेंबर या कालावधीत ते महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन मराठा बांधवांशी संवाद साधणार आहेत. कुणबी प्रमाणपत्र, प्रमाणपत्राची वैधता आणि आरक्षणासंदर्भातील विविध अडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न या दौऱ्याच्या माध्यमातून केला जाणार आहे.
दौऱ्याचं स्वरूप आणि वेळापत्रक
मनोज जरांगे यांनी सांगितलं की, महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा दौरा चार ते पाच टप्प्यांमध्ये केला जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी एक पूर्ण दिवस दिला जाणार आहे. या दौऱ्यात कोणत्याही सभा किंवा बैठका आयोजित केल्या जाणार नाहीत. त्याऐवजी मराठा समाजातील नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेतल्या जाणार आहेत. कोणत्या जिल्ह्यात कोणत्या दिवशी जाणार, याचं वेळापत्रक १ डिसेंबर रोजी जाहीर केलं जाणार आहे.
हैदराबाद गॅझेटिअरवरून सरकारला सवाल
हैदराबाद गॅझेटिअरच्या अंमलबजावणीवरूनही मनोज जरांगे यांनी सरकारला लक्ष्य केलं. सरकारने एक वर्षापूर्वी हैदराबाद गॅझेटिअरचा जीआर काढला आहे. शिंदे समिती २५, २६ आणि २७ डिसेंबर रोजी हैदराबादला जाऊन जुन्या नोंदी शोधणार आहे. मात्र समिती नेमक्या कोणत्या नोंदी शोधण्यासाठी जात आहे, हे नंतर स्पष्ट होईल, असं मनोज जरांगे म्हणाले. या कामासाठी नोंदी वाचणारे अभ्यासक सोबत असणं आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं. मराठवाड्यासाठी एक वर्षापूर्वी जीआर काढण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने होत असल्याचा दावा त्यांनी केला. पश्चिम महाराष्ट्रासाठीही जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं त्यांनी नमूद केलं. सातारा आणि कोल्हापूर संस्थानच्या नोंदींचाही प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मनोज जरांगे म्हणाले. सरकारच्या बाजूने बोलणाऱ्यांनी आता सरकारला जाब विचारावा. हैदराबाद गॅझेटिअरचा जीआर काढल्यानंतर कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप अपेक्षित वेगाने का होत नाही, असा सवाल जरांगे यांनी उपस्थित केला. गरीब मराठा समाजातील तरुणांनी संघर्ष करून हे मिळवलं आहे. त्यामुळे संपूर्ण मराठा समाजाने सरकारकडे ठामपणे मागणी लावून धरली पाहिजे, असं आवाहनही त्यांनी केलं.
Leave a Reply