मराठी रंगभूमीवर आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या भक्ती बर्वे यांचा जन्म १० सप्टेंबर १९४८ रोजी सांगली येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. त्यांनी कारकिर्दीची सुरुवात बालरंगभूमीपासून केली आणि पुढे आकाशवाणी तसेच दूरदर्शनवर वृत्तनिवेदिका म्हणूनही काम केलं. मात्र, पु. ल. देशपांडे यांच्या ‘ती फुलराणी’ या नाटकातील त्यांच्या भूमिकेनं त्यांना घराघरांत लोकप्रिय केलं. या नाटकाचे त्यांनी ११११ हून अधिक प्रयोग केले.
शफी इनामदार यांच्यासोबतची प्रेमकहाणी
एका हिंदी चित्रपटाच्या निमित्तानं भक्ती बर्वे यांची ओळख अभिनेता शफी इनामदार यांच्याशी झाली. ही ओळख पुढे प्रेमात बदलली आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. शफी इनामदार हे हिंदी चित्रपट आणि मालिकांमधील लोकप्रिय अभिनेते होते. ‘ये जो है जिंदगी’ या मालिकेमुळे त्यांना विशेष प्रसिद्धी मिळाली होती. दोघांचा संसार आनंदात सुरू होता. मात्र, १३ मार्च १९९६ रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं शफी इनामदार यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानं भक्ती बर्वे यांना मोठा धक्का बसला.
पतीच्या निधनानंतर पाच वर्षांनी काळाचा घाला
पतीच्या निधनानंतरही भक्ती बर्वे यांनी स्वतःला कामात व्यग्र ठेवलं आणि त्या रंगभूमीवर सक्रिय राहिल्या. मात्र, १२ फेब्रुवारी २००१ रोजी त्यांच्या आयुष्याचा शेवटचा प्रवास ठरला. वाई येथे कार्यक्रम सादर करून मुंबईला परतत असताना मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात भक्ती बर्वे आणि त्यांच्या चालकाचं निधन झालं. वयाच्या अवघ्या ५२व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. भक्ती बर्वे यांना त्यांच्या अभिनयासाठी संगीत नाटक अकादमी पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं.
Leave a Reply