सोमवार, २३ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

मुख्यमंत्रीपदाची इच्छा? मुंढे म्हणाले, विश लिस्टचा भाग

पुण्यात युवा महोत्सवात एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांना मुख्यमंत्रीपदाची इच्छा आहे का, असे विचारले. त्यावर ही इच्छा केवळ विश लिस्टचा भाग असल्याचे ते म्हणाले.

मुख्यमंत्रीपदाची इच्छा? मुंढे म्हणाले, विश लिस्टचा भाग

पुण्यातील एफसी कॉलेजच्या मैदानावर सुरू असलेल्या युवा महोत्सवात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचे युवक-युवतींसाठी विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानासाठी मोठ्या संख्येने युवक-युवती उपस्थित राहिले. व्याख्यानावेळी मुंढे यांनी उपस्थितांच्या प्रश्नांनाही उत्तरे दिली. त्यावेळी त्यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला.

त्यावर मुख्यमंत्री होण्याची इच्छा ही केवळ विश लिस्टचा भाग असल्याचे मुंढे यांनी म्हटले. मी विश लिस्टमध्ये राहत नाही, तर वास्तवात जगतो, असे त्यांनी स्पष्ट केले. मी एक लोकसेवक आहे आणि केवळ नोकरीपुरते मर्यादित न राहता आपली भूमिका समजून ती जगण्याचा प्रयत्न करतो, असेही मुंढे म्हणाले. प्रत्येक व्यक्तीचा स्वाभिमान आणि प्रतिष्ठा जपणं, हीच माझी जीवनाची व्याख्या असल्याचे त्यांनी सांगितले.

अहवालाचा कालावधी १४ दिवसांवर येणार

तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात जोरदार कारवाई सुरू आहे. त्यासंदर्भातही मुंढे यांनी माहिती दिली. गेल्या सहा महिन्यांपासून अहवाल येण्याच्या कालावधीत घट झाली आहे. पूर्वी अहवाल येण्यासाठी ३० दिवस ते सहा महिने लागत होते. आता हा कालावधी २० दिवसांवर आला आहे आणि पुढच्या काळात तो १४ दिवसांवर येईल, असे मुंढे यांनी सांगितले.

यासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि साधनसामग्री आणली जात आहे. शिफ्टमध्ये काम केले जात आहे. ज्या सुधारणा आवश्यक आहेत, त्या केल्या जात असून त्यात आणखी सुधारणा केली जाईल, असेही त्यांनी म्हटले.

हेल्थ सप्लिमेंटच्या दाव्यांवर इशारा

हेल्थ सप्लिमेंटमध्ये अत्यंत चुकीच्या पद्धतीने सेवनाची जाहिरात केली जाते. हे सेवन केल्यास मसल्स गेन होतील, असा दावा केला जातो. हे अत्यंत चुकीचे असून याला कुठलीही कायदेशीर मान्यता नाही. कोणतेही हेल्थ सप्लिमेंट किंवा न्यूट्रिशन उत्पादन असा दावा करू शकत नाही. उत्पादन करणारे आणि विक्रेतेही असा दावा करू शकत नाहीत, असे मुंढे यांनी सांगितले. त्यामुळे कोणतीही जिम किंवा प्रोटीन विक्रेता किंवा फार्मसी कंपनी असे करत असेल, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा मुंढे यांनी दिला.

जिममधील व्यक्ती किंवा विक्री करणाऱ्यांना विक्रीचा अधिकार नाही. त्यांना विक्री करायची असेल तर त्यासाठी परवाने घ्यावे लागतील. परवाने घेतले तरी त्यांना काहीही विकायची परवानगी नसेल. उत्पादनावर योग्य माहिती आहे की नाही, हे पाहण्याची जबाबदारी विक्रेत्याची आहे. चुकीचा ब्रँड, चुकीचा दावा, चुकीचे लेबल किंवा चुकीचे दावे करणाऱ्या इन्फ्लुएन्सरवरही कायदा समान असून त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही मुंढे यांनी स्पष्ट केले.

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance