डिलिमिटेशन विधेयकावरून सध्या राजकीय वातावरण तापले आहे. हे विधेयक मंजूर करण्यासाठी खासदारांना सत्ताधारी आघाडीच्या बाजूने वळवण्याकरता १५० कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. शरद पवार यांच्या गटाने या विधेयकाच्या बाजूने मतदान करावे, अशी चर्चा सुरू आहे. त्याच्या मोबदल्यात सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रिपद मिळू शकते, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. या सगळ्या चर्चेवर सुळे यांनी आता पहिल्यांदाच आपली भूमिका मांडली आहे.
विधेयक आल्यावर पक्ष भूमिका स्पष्ट करेल
सुळे यांनी सांगितले की, डिलिमिटेशनचे विधेयक अद्याप आपल्यापर्यंत पोहोचलेले नाही. विधेयक आल्यानंतर आपला पक्ष त्यावर आपली भूमिका स्पष्ट करेल, असे त्या म्हणाल्या. संजय राऊत यांनी केलेल्या आरोपाबाबत विचारले असता सुळे म्हणाल्या की, बळकट लोकशाहीत आरोप करण्याचा अधिकार प्रत्येकाला असतो.
दुष्काळग्रस्तांच्या मदतीवर भाष्य
दुष्काळग्रस्तांना मिळणाऱ्या मदतीबाबत बोलताना सुळे म्हणाल्या की, आपण स्वतः दर आठवड्याला आपल्या लोकसभा मतदारसंघातील परिस्थितीचा आढावा घेतो. प्रश्न गंभीर आहे आणि आपण सातत्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. शेवटच्या व्यक्तीपर्यंत मदत कशी पोहोचेल, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
सोने आणि चांदीच्या दरात झालेल्या घसरणीबाबत सुळे म्हणाल्या की, गेल्या आठवड्यापासून सोने-चांदीचे भाव कोसळताना दिसत आहेत. दर अद्याप स्थिर झालेले नाहीत. दोन-तीन दिवसांत याबाबत स्पष्टता येईल आणि त्यामागचे कारणही समजेल, असे त्यांनी सांगितले. नरेंद्र मोदी यांच्या विधानाबाबत विचारले असता त्या म्हणाल्या की, आपण ते विधान वाचलेले नाही. वृत्तपत्रांमध्ये अर्थकारणाशी संबंधित बातम्या वाचल्या असून ट्रम्प चीनमध्ये गेल्याचा परिणाम, तेलाचे भाव आणि दुधाचे वाढलेले दर याकडे आपण लक्ष दिल्याचे त्यांनी सांगितले.
दिवंगत रामराव वडकुते यांना श्रद्धांजली
दिवंगत भाजप खासदार रामराव वडकुते यांना श्रद्धांजली वाहताना सुळे म्हणाल्या की, ते राष्ट्रवादीत होते आणि त्यांनी आपल्यासोबत काम केले होते. विधानपरिषद सदस्याचे पद त्यांना पहिल्यांदा राष्ट्रवादीनेच दिले होते. आपले कौटुंबिक संबंध राहिले असून आपला पक्ष आणि पवार-सुळे कुटुंबाकडून त्यांना श्रद्धांजली अर्पण करत असल्याचे त्या म्हणाल्या. ते चांगले खासदार होते, त्यांचा स्वभाव चांगला होता आणि ते चांगले काम करत होते, असेही सुळे म्हणाल्या.
ठाण्यात राम पूर्णेकर यांनी भेट घेतल्यानंतर सुळे म्हणाल्या की, ते भेटायला आले होते. ते अस्वस्थ आहेत आणि त्यांना न्याय मिळावा, अशी त्यांची अपेक्षा आहे. आता हिवाळी अधिवेशन येत आहे. या प्रकरणात पारदर्शक चौकशी व्हावी, अशी मागणी विधानसभेत करावी, अशी विनंती आपण जितेंद्र आव्हाड यांना केली असल्याचे त्यांनी सांगितले. जे खरे आहे, ते समोर यावे आणि न्याय मिळालाच पाहिजे, असे सुळे म्हणाल्या.
महाराष्ट्रातील वाढत्या गुन्हेगारीवर बोलताना सुळे म्हणाल्या की, केंद्राचा आकडेवारीदेखील सांगते की, राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. हा विषय सर्वांनी गांभीर्याने घेतला पाहिजे. याबाबत आपण मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहिले होते. महाराष्ट्राचे पोलीस हे शेतकऱ्यांची मुले आहेत, असे सांगत गुन्हेगारी वाढत असल्यावर चर्चा झाली पाहिजे, असे त्या म्हणाल्या. अधिवेशनात दहा आमदार या विषयावर सविस्तर चर्चा करतील, असेही सुळे यांनी सांगितले.
Leave a Reply