रविवार, २२ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

रत्नागिरी क्रीडा संकुलाला ३१ मार्चची डेडलाईन

रत्नागिरी जिल्हा क्रीडा संकुलाचे रखडलेले काम ३१ मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी बैठकीत कडक निर्देश दिले.

रत्नागिरी क्रीडा संकुलाला ३१ मार्चची डेडलाईन

तब्बल १४ वर्षांपासून रखडलेल्या रत्नागिरी जिल्हा क्रीडा संकुलाच्या कामाला अखेर ३१ मार्च २०२७ ची अंतिम मुदत देण्यात आली आहे. संथगतीने सुरू असलेल्या बांधकामाबाबत पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, कोणत्याही परिस्थितीत निर्धारित मुदतीत काम पूर्ण करण्याचे कडक निर्देश दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत क्रीडा संकुलाच्या बांधकामाचा जिल्हा क्रीडा विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आढावा घेण्यात आला.

अपूर्ण इमारतीत अवैध धंदे; पोलिसांना कारवाईचे आदेश

अपूर्ण इमारतीचा गैरफायदा घेत तेथे अवैध धंदे सुरू असल्याची बाब आढावा बैठकीत समोर आली. याची गंभीर दखल घेत पोलिसांना तातडीने कारवाईचे आदेश देण्यात आले. संकुल परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.

संकुलातील बॅडमिंटन हॉल, टेनिस कोर्ट आणि अन्य क्रीडा सुविधांचा वापर केवळ खेळाडूंच्या सरावासाठीच करावा. अन्य कारणांसाठी या सुविधांचा वापर करू नये, अशी स्पष्ट ताकीद देण्यात आली. साळवी स्टॉप येथील जलतरण तलावाच्या नूतनीकरण व दुरुस्तीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करण्याची सूचनाही करण्यात आली.

महाराष्ट्रातील पहिले स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र

रत्नागिरीत मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या कामाचाही आढावा घेण्यात आला. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून उभारण्यात येणारे हे केंद्र महाराष्ट्रातील पहिले ठरणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक साहित्य, आवश्यक सुविधा आणि अभ्यासासाठी पोषक वातावरण मिळावे, यासाठी ग्रंथालय विभागाने नियोजन करावे, असे निर्देश दिले.

दरम्यान, रत्नागिरी नगर वाचनालयाच्या ग्रंथपाल मीनल हळदनकर यांना २०२४-२५ चा विभागस्तरीय डॉ. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पालकमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance