कुंभमेळ्याच्या तयारीसाठी राज्य सरकार ३० हजार कोटी रुपये खर्च करत असेल, तर तितकाच निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठीही द्यावा, अशी मागणी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे नेते डॉ. प्रवीण तोगडिया यांनी केली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात भीषण दुष्काळाची चाहूल असून, युद्धपातळीवर चारा व पाणीपुरवठ्याची सोय करावी, असेही ते म्हणाले.
## गुरे कवडीमोल भावाने विकावी लागत आहेत
राज्यात चारा आणि पाण्याची टंचाई निर्माण झाली असून, ७० ते ८० हजार रुपयांची गाय-म्हैस शेतकऱ्यांना अवघ्या ३० हजार रुपयांत विकावी लागत आहे. १५२ शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी परिस्थितीचे गांभीर्य दाखवते. जिथे पाणीटंचाई निर्माण होणार आहे, ती गावे आत्ताच निश्चित करून पुढील महिन्याभरात पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी तोगडिया यांनी केली. कर्नाटक, मध्य प्रदेश आणि गुजरात सरकारशी चर्चा करून चारा खरेदी करावा, तसेच दर एक-दोन महिन्यांनी शेतकऱ्यांच्या हातात रोख पैसे द्यावेत, असेही त्यांनी म्हटले आहे. दुष्काळाच्या काळात पूर्वी राजे तिजोरी खाली करत असत, त्याप्रमाणे सरकारनेही तिजोरी खाली करण्याचे पुण्य घ्यावे, असे तोगडिया म्हणाले. कुंभमेळ्याच्या तयारीबद्दल त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकही केले.
## आरक्षणापेक्षा रोजगारावर लक्ष द्या
मराठा-ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरही तोगडिया यांनी आपली भूमिका मांडली. रोजगार नसल्यामुळेच आरक्षणाची मागणी होत असल्याचे त्यांनी सांगितले. आरक्षणाच्या वादात अडकण्यापेक्षा शिक्षण, आरोग्य आणि रोजगारावर लक्ष केंद्रित करावे, असे त्यांचे म्हणणे आहे. उद्योगधंदे रोजगार देऊ शकले नाहीत, याची कबुली खुद्द पंतप्रधानांनीही दिल्याची आठवण त्यांनी करून दिली. ‘मुलाला रोजगार नसेल तर कोणी मुलगी देणार नाही,’ अशा शब्दांत त्यांनी तरुणांची व्यथा मांडली.
Leave a Reply