सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकावरून निर्माण झालेल्या वादावर काँग्रेस नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शिंदेसेनेच्या नेत्यांवर टीका केली आहे. पुस्तक फाडून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या कृतीत पुढे असलेले नेते सत्तेच्या जवळ राहण्यासाठी अनेक पक्ष फिरून आलेले आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
शिंदेसेनेचा आरोप काय?
शिंदेसेनेच्या नेत्यांनी या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक लेखन असल्याचा आरोप केला. बाळासाहेब भवन येथे पत्रकार परिषद घेत त्यांनी पुस्तकाची पाने फाडली आणि पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली. पुस्तकातील पान क्रमांक २०१ आणि ४४३ वर सावरकरांबाबत अवमानजनक उल्लेख असल्याचे त्यांनी सांगितले. या कृतीवरून ठाकरेसेनेनेही आरोप केला की, पुस्तकासोबत बाळासाहेब ठाकरे यांचाही फोटो फाडण्यात आला.
थोरात यांनी काय म्हटले?
एखाद्या पुस्तकातील विचारांशी मतभेद असू शकतात. ते मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. त्यासाठी पुस्तक वाचावे आणि त्यातील मुद्द्यांवर बोलावे, असे थोरात यांनी समाजमाध्यमावरील आपल्या संदेशात म्हटले. पुस्तक फाडून प्रसिद्धी मिळवण्याचा हा प्रयत्न दुर्दैवी असल्याचे त्यांनी नमूद केले. ज्यांना स्वतःचाच इतिहास-भूगोल नाही, त्यांनी सोनिया गांधी यांच्या जीवनप्रवासावर बोलणे हास्यास्पद असल्याचेही ते म्हणाले. सार्वजनिक जीवनात मतभेद व्यक्त करतानाही सुसंस्कृतपणा जपला पाहिजे, अशी आपली भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सोनिया गांधी यांचा त्याग, त्यांचा संघर्ष आणि देशाप्रतीचे समर्पण आपण जवळून पाहिले असल्याचे थोरात म्हणाले. या पुस्तकातून तो जीवनप्रवास त्यांच्या स्वतःच्या शब्दांत समजून घेण्याची संधी वाचकांना मिळाली आहे. अशा प्रकारांमुळे उलट अधिक लोक हे पुस्तक वाचतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Leave a Reply