मराठी रंगभूमीवरील गाजलेले नाटक ‘प्रपोजल’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक राजन ताम्हाणे या नाटकाच्या नव्या पर्वासह रंगभूमीवर परतत आहेत. तब्बल 350 यशस्वी प्रयोगांचा टप्पा गाठलेले हे नाटक आता नव्या कलाकारांच्या संचासह सादर होणार आहे. रंगनील निर्मित आणि सौ. कल्पना विलास कोठारी प्रस्तुत या नाटकाचे लेखन सुरेश चिखले यांनी केले असून दिग्दर्शन राजन ताम्हाणे यांचे आहे. जुन्या नाटकाचा गाभा कायम ठेवत बदलत्या काळातील कलाकारांच्या माध्यमातून त्याला नवा रंग देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
नव्या पिढीसाठी नव्याने सादरीकरण
2012 मध्ये रंगभूमीवर आलेल्या ‘प्रपोजल’ला नव्या पिढीसमोर पुन्हा सादर करण्यामागची भूमिका ताम्हाणे यांनी स्पष्ट केली. गेल्या 10 ते 14 वर्षांत प्रेक्षकांची एक नवी पिढी तयार झाली आहे. त्यावेळी जे प्रेक्षक लहान होते, ते आता मोठे झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी हे नाटक नव्याने अनुभवण्याची संधी असल्याचे ताम्हाणे म्हणाले.
शेवटच्या लोकलमधील गोष्ट
मुंबईकरांच्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग असलेली लोकल ट्रेन या नाटकाचा केंद्रबिंदू आहे. दिवसभराच्या धावपळीनंतर घरी परतणाऱ्या सर्वसामान्य नोकरदारांचा लोकल प्रवास जिथे संपतो, तिथून या नाटकातील गोष्ट सुरू होते. रात्रीच्या शेवटच्या लोकलमध्ये मोजक्या प्रवाशांच्या उपस्थितीत घडणारे धक्कादायक, विनोदी आणि हृदयस्पर्शी प्रसंग प्रेक्षकांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात.
संहिता तीच, कलाकार नवे
रिवायवल करताना मूळ संहितेत एक पैशाचाही बदल केला जात नाही, यावर ताम्हाणे ठाम आहेत. संहितेचा गाभा जपून नव्या कलाकारांच्या माध्यमातून तिचा वेगळा आविष्कार घडवणे, हेच या प्रक्रियेचे खरे वैशिष्ट्य असल्याचे ते सांगतात. ‘प्रपोजल’मध्ये लोकलचा डबा हाच नाटकाचा अविभाज्य भाग असल्याने तो तसाच ठेवण्यात आला आहे. बदल झाला आहे तो फक्त त्या डब्यात प्रवास करणाऱ्या पात्रांचा. गेल्या 14 वर्षांत बदललेल्या कलाकारांची देहबोली, संवादफेक आणि अभिनयातील ऊर्जा यामुळे त्याच संहितेचा नवा अनुभव प्रेक्षकांना मिळेल, असा विश्वास ताम्हाणे यांनी व्यक्त केला आहे. या नाटकाला प्रदीप मुळ्ये यांचे नेपथ्य आणि राहुल रानडे यांचे संगीत लाभले आहे. मनाली रायसोनी निर्मिती प्रमुख असून दीपक गोडबोले सूत्रधार म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.
Leave a Reply