बिहारच्या मोकामा मतदारसंघाचे आमदार अनंत सिंह यांच्या मुलीच्या लग्नाची सध्या देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे. अनंत सिंह यांची मुलगी शिवांगी हिच्या लग्नाची तयारी भव्य स्वरूपात सुरू असून या सोहळ्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केला जात आहे. पाहुण्यांना लग्नात सहभागी होण्यासाठी आणि त्यांना परत घरी सोडण्यासाठी वऱ्हाडी मंडळीकरिता थेट हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली आहे. पाहुण्यांचे जेवण, मनोरंजन आणि खाण्यापिण्याचे खास नियोजन करण्यात आले असून अगदी छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देण्यात आले आहे.
25 नोव्हेंबरला शाही विवाह सोहळा
अनंत सिंह यांचे मूळ गाव असलेल्या नादावान (बारह) येथे हे शाही लग्न पार पडणार आहे. 25 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या विवाह सोहळ्याला सुमारे 4 लाख पाहुणे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या लग्नात 150 हून अधिक पदार्थांची चव पाहुण्यांना चाखता येणार आहे. काही पदार्थ तयार करण्यासही सुरुवात झाली आहे.
50 लाख रसगुल्ले, किंमत 9 कोटी रुपये
या लग्नातील सर्वात जास्त चर्चेत असलेली गोष्ट म्हणजे पाहुण्यांना दिले जाणारे 50 लाख रसगुल्ले. पाहुण्यांना वाढण्यासाठी तब्बल 50 लाख रसगुल्ले तयार केले जात आहेत. बाजारभावानुसार या रसगुल्ल्यांची किंमत तब्बल 9 कोटी रुपये आहे. फक्त रसगुल्ल्यांवर इतके पैसे खर्च केले जात आहेत. लग्नासाठी रसगुल्ले तयार करण्याचा प्रत्यक्ष खर्च यापेक्षा जास्त असू शकतो, असा अंदाज आहे.
विजेत्याला थार गाडीचे बक्षीस
पाहुण्यांच्या करमणुकीसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात जिंकणाऱ्यांना बक्षीस म्हणून थेट थार गाडी दिली जाणार आहे. या स्पर्धेसाठी विविध राज्यांतील घोडे आधीच नादावान येथे पोहोचले आहेत. ही शर्यत 25 नोव्हेंबर रोजी होणार असून विजयी स्पर्धकाला थार गाडी बक्षीस म्हणून दिली जाणार आहे. या स्पर्धेसाठी एक स्वतंत्र मैदानही तयार करण्यात आले आहे.
Leave a Reply