मुंबई पोलिस दलासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने कामकाज अधिक सक्षम करण्याच्या दिशेने नव्या प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले. या प्रकल्पांच्या माध्यमातून पोलिसांचे कामकाज अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. देवेन भारती यांनी या प्रकल्पांच्या प्रवासाबद्दल माहिती दिली.
२०१७ मधील प्रकल्प २०१९ नंतर का थांबले?
भारती यांनी सांगितले की, २०१७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या प्रेरणेतून तंत्रज्ञानावर आधारित अनेक प्रकल्प सुरू करण्यात आले होते. मात्र २०१९ नंतर या प्रकल्पांकडे दुर्लक्ष झाले. काही महत्त्वाचे प्रकल्प बंद पडले, तर काही योजना जुन्या तंत्रज्ञानाकडे परतल्या. डायल ११२ या महत्त्वाच्या सेवेचे उदाहरण देत त्यांनी सांगितले की, जीपीएस सुविधा असलेल्या वाहनांचे थेट स्थान शोधण्याची व्यवस्था थांबवण्यात आली होती.
२०२२ नंतर प्रकल्पांना पुन्हा गती
२०२२ मध्ये देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यानंतर या सर्व प्रकल्पांना पुन्हा वेग मिळाला आणि मुंबई पोलिसांचे अनेक प्रश्न मार्गी लागले, असे भारती यांनी सांगितले. सध्या सादर करण्यात येत असलेले उपक्रम ह्याच प्रयत्नांचे फलित आहेत. एमपीआयएएस या गतिमान आणि विस्तारक्षम व्यासपीठामुळे सर्व प्रकल्प एकमेकांशी जोडले गेले आहेत. त्यामुळे कामकाजात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढेल, जनतेला अखंड सेवा मिळेल, पोलिसांवरील कामाचा ताण कमी होईल आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांचे काम सोपे होईल, असा विश्वास भारती यांनी व्यक्त केला.
Leave a Reply