उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एका कुटुंबाला रेल्वेचे नियम न पाळणे चांगलेच महागात पडले. पाहुण्यांना निरोप देण्यासाठी रेल्वे स्थानकावर गेलेले १२ जण साधी रेल्वे समजून वंदे भारत ट्रेनमध्ये चढले. मात्र, ही स्वयंचलित ट्रेन असल्याने दरवाजे आपोआप बंद झाले आणि हे सर्वजण ट्रेनमध्ये अडकले. त्यानंतर त्यांना तब्बल १३९ किलोमीटरचा प्रवास करावा लागला आणि शेवटी ३६ हजार रुपयांचा दंड भरावा लागला.
दरवाजे बंद होताच ट्रेन सुरू झाली
रविवारी सकाळी वाराणसी-नवी दिल्ली वंदे भारत एक्स्प्रेस (ट्रेन क्रमांक २२४१५) कानपूर स्थानकावर उभी होती. आपल्या नातेवाईकांना डब्यात बसवून देण्यासाठी १२ जण ट्रेनमध्ये चढले. सकाळी साडेनऊ वाजता ट्रेन सुटण्याची वेळ होताच तिचे स्वयंचलित दरवाजे बंद झाले आणि हे सर्वजण आत अडकले. त्यांनी ट्रेनमधील कर्मचाऱ्यांकडे गाडी थांबवण्याची विनंती केली, परंतु ही अत्याधुनिक ट्रेन तातडीने थांबवता येत नसल्याचे कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले.
डब्यात प्रवाशांचा गोंधळ वाढत असल्याचे पाहून रेल्वे कर्मचाऱ्यांनी टूंडला कंट्रोल रूमला याची माहिती दिली. अखेर कानपूरमधून निघाल्यानंतर तब्बल ७९ मिनिटांच्या प्रवासानंतर इटावा जंक्शनवर विनियोजित थांबा घेऊन ही ट्रेन थांबवण्यात आली.
प्रत्येकाकडून ३ हजार रुपये दंड
कानपूर सेंट्रल ते इटावा जंक्शन हे अंतर सुमारे १३९ किलोमीटर आहे. इटावा स्थानकावर ट्रेन थांबताच या १२ जणांना खाली उतरवण्यात आले आणि त्यांना रेल्वे सुरक्षा दलाच्या चौकीत नेण्यात आले. रेल्वेच्या वाणिज्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता, यापैकी कोणाकडेही प्रवासाचे वैध तिकीट किंवा साधे प्लॅटफॉर्म तिकीटही नसल्याचे समोर आले. त्यामुळे नियमांनुसार प्रत्येक व्यक्तीकडून ३ हजार रुपये याप्रमाणे १२ जणांकडून एकूण ३६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
तिकीट न घेता प्रवास केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते. इतकेच नाही, तर रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकीट नसले तरी दंड भरावा लागतो. आरामदायी आणि वेगवान प्रवासासाठी भारतीय रेल्वेकडून देशभरात अत्याधुनिक वंदे भारत एक्स्प्रेस चालवल्या जात आहेत. मात्र, या अत्याधुनिक ट्रेनच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास मोठा फटका बसू शकतो, हे या घटनेवरून पुन्हा एकदा समोर आले आहे.
Leave a Reply