टाटा सन्स आणि टाटा ट्रस्ट यांच्यातील मतभेदांना आता नवे वळण मिळाले आहे. रतन टाटा यांचे धाकटे बंधू जिमी एन. टाटा यांनी दीर्घकाळ मौन बाळगल्यानंतर प्रथमच उघडपणे आपली भूमिका मांडली आहे. टाटा ट्रस्टमध्ये नोएल टाटा यांच्या कुटुंबाचा वाढता प्रभाव यावर त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. नोएल टाटा यांच्या कुटुंबीयांचा ट्रस्टमधील सहभाग वाढल्यानंतर टाटा सन्सशी संबंधित निर्णय घेण्याचे अधिकार एकाच ठिकाणी केंद्रित झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या वाढत्या प्रभावाला त्यांनी टाटा सन्सवर मागच्या दाराने नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.
चंद्रशेखरन यांना पाठिंबा
जिमी टाटा यांनी टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. अनेक वर्षे ट्रस्टच्या बैठका आणि सार्वजनिक बाबींपासून दूर राहिलेल्या जिमी टाटा यांनी सह-विश्वस्त विजय सिंग यांच्या प्रश्नांना उत्तर देताना ही भूमिका मांडली. त्यामुळे जिमी टाटा आता उघडपणे नोएल टाटा यांच्या विरोधात उभे राहिल्याचे मानले जात आहे.
२०१३-१४ च्या बदलांवरही प्रश्न
जिमी टाटा यांनी २०१३-१४ च्या काळात टाटा सन्सच्या आर्टिकल्स ऑफ असोसिएशनमध्ये करण्यात आलेल्या बदलांवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. या बदलांमुळे टाटा ट्रस्टची परोपकारी उद्दिष्टे आणि टाटा सन्सचे व्यावसायिक कामकाज यांच्यातील स्पष्ट फरक पुसट झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. काही विश्वस्तांच्या कार्यकाळाच्या मर्यादेबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे विश्वस्तांची स्वायत्तता धोक्यात येऊ शकते आणि असहमती दर्शवणाऱ्यांचे आवाज दाबले जाऊ शकतात, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
नोएल टाटा हे रतन टाटांचे सावत्र भाऊ आहेत, तर जिमी टाटा हे त्यांचे सख्खे धाकटे भाऊ आहेत. दोघांचे वडील नवल टाटा होते. रतन आणि जिमी हे नवल टाटा आणि त्यांच्या पहिल्या पत्नी सुनी कमिसारिएट यांचे सुपुत्र आहेत, तर नोएल हे नवल टाटा आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नी सिमोन टाटा यांचे सुपुत्र आहेत. ऑक्टोबर २०२४ मध्ये रतन टाटा यांच्या निधनानंतर नोएल टाटा यांची टाटा ट्रस्टचे चेअरमन म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. टाटा ट्रस्ट ही टाटा समूहाच्या कामकाजावर देखरेख ठेवणारी मुख्य संस्था आहे.
Leave a Reply