अंधेरी पूर्वेतील पंपहाउस परिसरात पश्चिम द्रुतगती महामार्गाखालील पुलाजवळ वाहतूक नियमनासाठी नियुक्त केलेल्या वॉर्डनच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी असतानाही काही वॉर्डन रिक्षामध्ये बसून किंवा मोबाईलवर बोलण्यात व्यस्त असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असून, परिसरातील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
गणवेशाचे पालन नाही
वॉर्डनसाठी वाहतूक पोलिसांच्या धर्तीचा गणवेश निश्चित असतानाही काही जणांकडून त्याचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. शर्ट व्यवस्थित न घालणे, टोपी आणि ओळखपत्र नसणे अशा प्रकारांमुळे त्यांच्या कर्तव्याविषयीही प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यातच काही वेळा या ठिकाणी वाहतूक पोलिसांची उपस्थिती नसते. परिणामी, नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर नियंत्रण ठेवण्यात अडचणी येत आहेत.
कायमस्वरूपी पोलिस नेमण्याची मागणी
या संदर्भात गस्तीवरील वाहनातील वाहतूक निरीक्षक विनायक ताम्हाणकर यांच्याकडे विचारणा केली असता, संबंधित वॉर्डन खासगी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, या ठिकाणी वाहतूक पोलिस उपलब्ध नसल्याबाबत तक्रार करण्याचा सल्ला त्यांनी दिला. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणी तैनात असलेले वॉर्डन वाहतूक नियमन करण्याऐवजी अनेकदा रिक्षामध्ये बसलेले किंवा मोबाईलवर बोलत असल्याचे दिसते. विचारणा केली असता, सतत उभे राहिल्याने पाय दुखत असल्याचे आणि मिळणारे मानधन पुरेसे नसल्याचे त्यांनी सांगितल्याचे समजते. काही वेळा रिक्षाचालकच वाहतुकीचे नियमन करत असल्याचेही दिसून येते.
पंपहाउस परिसरात चोवीस तास वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे येथे कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी आणि त्यांच्या मदतीसाठी शिस्तबद्ध व जबाबदारीने काम करणाऱ्या वॉर्डनची नियुक्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. वाहतूक पोलिस प्रशासनाने या प्रकाराची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Leave a Reply