राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कृषीविषयक तसेच इतर विभागांच्या योजनांचा लाभ थेट आणि कोणत्याही अडथळ्याविना मिळावा, यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शासनाच्या ॲग्रीस्टॅक प्रणालीमध्ये शेतकऱ्यांची माहिती अद्ययावत असणे अत्यंत आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व आणि विशेषतः दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया तातडीने पूर्ण करून फार्मर आयडी प्राप्त करून घ्यावा, असे महत्त्वाचे आवाहन मदत व पुनर्वसन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
फार्मर आयडी का आवश्यक आहे?
शासनाच्या विविध योजनांमधून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य, अनुदान आणि नैसर्गिक आपत्तीमधील मदत दिली जाते. पात्र शेतकऱ्यांना ही मदतीची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी आवश्यक नोंदणी आणि पडताळणी प्रक्रिया पूर्ण असणे बंधनकारक आहे. ॲग्रीस्टॅक प्रणालीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सर्व माहिती एकत्रित आणि अद्ययावत केली जात आहे. यामुळे सरकारी योजनांचा लाभ देताना होणारा विलंब टळणार आहे.
ई-केवायसी किंवा फार्मर आयडी तयार करताना शेतकऱ्यांना काही तांत्रिक किंवा इतर अडचणी येत असल्यास राज्य शासनामार्फत त्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाणार आहे. त्यामुळे कोणत्याही कारणास्तव ही प्रक्रिया अपूर्ण ठेवू नये, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास शासकीय योजनांचे पैसे अडकण्याची शक्यता आहे.
फार्मर आयडी कुठे आणि कसा तयार करावा?
शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने पोहोचावा, यासाठी प्रशासनाने शेतकऱ्यांना प्रक्रियेला प्राधान्य देण्याची विनंती केली आहे. फार्मर आयडी तयार करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या सीएससी नागरी सुविधा केंद्रावर जाणे आवश्यक आहे.
केंद्रावर जाताना सोबत आधार कार्ड आणि आधारशी संलग्न असलेला मोबाईल क्रमांक सोबत नेणे गरजेचे आहे. तेथील यंत्रणांशी संपर्क साधून शेतकऱ्यांनी आपली माहिती अद्ययावत करावी आणि फार्मर आयडीची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी, असे आवाहन मदत व पुनर्वसन विभागाने केले आहे.
Leave a Reply