जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या एमए मराठी अभ्यासक्रमात एका महत्त्वाच्या साहित्यकृतीचा समावेश झाला आहे. जळगावचे लेखक आनंदा लोटन पाटील यांच्या ‘उजेड पेरणारी माणसं’ या वैचारिक पुस्तकाची संदर्भ ग्रंथ म्हणून निवड करण्यात आली आहे. विद्यापीठातील भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्रात एमएच्या मराठी विषयाचा अभ्यासक्रम निश्चित झाला असून, त्यातील द्वितीय सत्रातील ‘वैचारिक साहित्य’ या अभ्यास घटकासाठी हे पुस्तक संदर्भ ग्रंथ म्हणून वापरण्यात येणार आहे.
निवड कशी झाली
विभागप्रमुख तथा अभ्यासक्रम समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. म. सु. पगारे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ‘वैचारिक साहित्य’ या घटकासाठी लागणाऱ्या संदर्भ ग्रंथांची निवड केली. समितीत डॉ. दीपक खरात, डॉ. भारती सोनवणे, प्रा. डॉ. युवराज मानकर, डॉ. सुनील अवचार आणि प्रा. डॉ. आशुतोष पाटील यांचा समावेश होता. या समितीने आनंदा पाटील यांच्या पुस्तकाला संदर्भ ग्रंथ म्हणून मान्यता दिली. एमएच्या पहिल्या भागाच्या द्वितीय सत्रात विद्यार्थ्यांना निवडक वैचारिक लेखनाचा अभ्यास करताना या साहित्यकृतीचा उपयोग होईल.
पुस्तकात काय आहे
‘उजेड पेरणारी माणसं’ या पुस्तकात खानदेशातील निवडक अशा ८४ अवलियांचा संक्षिप्त जीवनप्रवास मांडण्यात आला आहे. कला, साहित्य, संस्कृती, शिक्षण आणि ग्रामसंस्कृती अशा विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या या व्यक्तींच्या कार्याचा आणि जीवनाचा आढावा पुस्तकात घेण्यात आला आहे. खानदेशाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनात या व्यक्तींनी दिलेल्या योगदानाची ओळख विद्यार्थ्यांना या पुस्तकातून होणार आहे. अभ्यासक्रमात या पुस्तकाचा समावेश झाल्याने वैचारिक साहित्याच्या अभ्यासाला स्थानिक जीवनाशी जोडलेला एक नवा आयाम मिळणार आहे.
Leave a Reply