येवल्याचे प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या येवला शाखेचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर क्षत्रिय यांना राज्यस्तरीय प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, सामाजिक कार्य आणि संघटनात्मक कार्यातील योगदानाची दखल घेत त्यांना प्रेसिडेंट्स ॲप्रिसिएशन अवॉर्ड बेस्ट प्रेसिडेंट हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे नागपूर येथे मास्टकॅन-२०२६ आणि इमाकॅन-२०२६ या वार्षिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत डॉ. क्षत्रिय यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्याला असोसिएशनचे राज्याध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी आणि मानद राज्य सचिव डॉ. विक्रांत देसाई उपस्थित होते.
वैद्यकीय सेवेसोबत सामाजिक बांधीलकी
डॉ. क्षत्रिय यांनी आधुनिक स्त्रीरोग उपचार, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया आणि वंध्यत्व निवारण उपचार उपलब्ध करून देत वैद्यकीय क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. मोफत रोगनिदान आणि शस्त्रक्रिया शिबिरांच्या माध्यमातून त्यांनी गोरगरीब रुग्णांना मदतीचा हात दिला आहे. वैद्यकीय सेवेसोबतच क्रिकेटची आवड, चित्रपटांतील भूमिका, डॉक्टरांना मार्गदर्शन आणि पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण असे अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी राबविले आहेत.
येवला शाखेच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात डॉक्टरांचे वैद्यकीय प्रश्न सोडविण्यासह विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात त्यांनी सिंहाचा वाटा उचलला आहे. या कार्याची राज्यस्तरावर दखल घेत हा सन्मान झाला. पत्नी भूलतज्ज्ञ डॉ. दीपाली क्षत्रिय यांच्यासोबत त्यांनी पुरस्कार स्वीकारला. आजपर्यंत केलेल्या वैद्यकीय आणि सामाजिक कार्याची ही पावती असून या कामाचा हा सर्वोत्तम गौरव असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
Leave a Reply