सोशल माध्यमावर सिंहस्थाशी संबंधित बनावट हॅन्डलचा पर्दाफाश झाल्यावर कुंभमेळा प्राधिकरण अधिक सतर्क झाले आहे. सिंहस्थ तयारीच्या अनुषंगाने नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील विकासकामे, पायाभूत सुविधांची उभारणी आणि भाविकांसाठीच्या सोयी-सुविधा तसेच अन्य माहितीसाठी अधिकृत सोशल माध्यम हॅन्डल्सचाच आधार घ्यावा, असे आवाहन प्राधिकरणाने केले आहे. बनावट माहितीपासून भाविकांची फसवणूक होऊ नये, यासाठी प्राधिकरणाने हे आवाहन केले आहे.
अधिकृत माहिती कुठे मिळेल
सिंहस्थ कुंभमेळा नियोजनाबाबत https://simhasthamahakumbh.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर माहिती, महत्त्वाच्या घडामोडी आणि अधिकृत घोषणा उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, प्राधिकरणाच्या सर्व अधिकृत समाजमाध्यम खात्यांच्या लिंक्सही या संकेतस्थळावर देण्यात आल्या आहेत. नागरिकांना संकेतस्थळावरूनच प्राधिकरणाच्या विविध डिजिटल माध्यमांपर्यंत पोहोचता येईल. सिंहस्थाच्या तयारीबाबतची माहिती, उपक्रम आणि महत्त्वाच्या घडामोडींची माहिती प्राधिकरणातर्फे निरनिराळ्या सोशल माध्यमांतून नियमितपणे प्रसिद्ध केली जाते. नागरिकांनी प्राधिकरणाच्या अधिकृत संकेतस्थळाला आणि सोशल मीडिया हँडल्सला भेट द्यावी. तसेच, समाजमाध्यमांवर प्रसारित होणाऱ्या माहितीची खातरजमा अधिकृत माध्यमांतून करूनच ती पुढे प्रसारित करावी, असे आवाहन प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.
प्राधिकरणाची अधिकृत माध्यमे
कुंभमेळा प्राधिकरणाची अधिकृत माध्यमे पुढीलप्रमाणे आहेत. संकेतस्थळ : https://simhasthamahakumbh.maharashtra.gov.in. यू ट्यूब : @official_ntkma. फेसबुक : @ntkmaofficia. एक्स (ट्विटर) : @NTKMA_official, @s_mahakumbh_IND, @s_mahakumbh_MH आणि @s_mahakumbh-glb. इन्स्टाग्राम : @ntkma_official, @simhastha.mahakumbh.ind, @simhastha.mahakumbh.mh आणि @simhastha.mahakumbh.glb. भाविकांनी सिंहस्थाबाबतची कोणतीही माहिती घेताना केवळ याच अधिकृत माध्यमांचा वापर करावा, असे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.
Leave a Reply