सोमवार, १६ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

कोसुर्डे सांडव्याचे काम निकृष्ट; दोषींवर कारवाईची मागणी

कोसुर्डे सांडव्याचे ३७ लाखांचे काम निकृष्ट असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. तडे व उखडलेला काँक्रिटचा थर यामुळे दर्जावर प्रश्न असून चौकशीची मागणी होत आहे.

कोसुर्डे सांडव्याचे काम निकृष्ट; दोषींवर कारवाईची मागणी

कळवण तालुक्यातील कोसुर्डे लघुपाटबंधारे प्रकल्पावरील सांडव्याच्या बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. ३७ लाख रुपये खर्चून उभारलेल्या या सांडव्याचे काम निकृष्ट असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत यापूर्वी आवाज उठवूनही अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याने आदिवासी बांधवांत नाराजी आहे. आता संबंधित विभागाच्या कारवाईकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

सांडव्याच्या बांधकामाला तडे जाणे, काँक्रिटचा थर उखडणे, बांधकामाखाली पोकळ्या निर्माण होणे तसेच दगड व खडी उघडी पडणे यामुळे कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. लाखो रुपयांचा निधी खर्च करूनही कामाची अशी अवस्था झाल्याने कामाच्या गुणवत्तेची स्वतंत्र तांत्रिक चौकशी करण्याची मागणी होत आहे.

दरम्यान, संबंधित विभागाने थातूरमातूर दुरुस्ती करून प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न करू नये, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. बांधकामाचे साहित्य, कामाची मोजमापे, मंजूर अंदाजपत्रक, तांत्रिक निकष आणि प्रत्यक्ष खर्चाची तपासणी करावी. दोष आढळल्यास संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करून त्याची अनामत रक्कम जप्त करावी तसेच संबंधित एजन्सीला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी होत आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी करावी, अशी मागणी

विकासकामांसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होतो. मात्र, कामे निकृष्ट दर्जाची होत असतील तर त्याचा फटका नागरिक व शेतकऱ्यांना बसतो. त्यामुळे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी करावी आणि जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

कोसुर्डे सांडव्याच्या दुरुस्तीसाठी अनेक वर्षांपासून आम्ही पाठपुरावा करीत होतो. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर शासनाकडून निधी उपलब्ध झाला. त्यामुळे ग्रामस्थांत समाधानाचे वातावरण होते. मात्र, कामाचा दर्जा निकृष्ट असून, दुरुस्तीच्या नावाखाली पुन्हा काही वर्षांतच बांधकाम खराब होणार असेल, तर इतका निधी खर्च करण्याचा उपयोग काय, त्यामुळे केवळ वरवरची दुरुस्ती न करता संपूर्ण कामाची तपासणी करून दोषींवर कारवाई करावी, असे ग्रामस्थ लक्ष्मण पवार यांनी सांगितले.

दुसरीकडे, कोसुर्डे लघुपाटबंधारे प्रकल्पावरील सांडव्याच्या कामाबाबत झालेल्या तक्रारींची पाहणी केली असून, आवश्यक तपासणी करण्यात येईल. मंजूर अंदाजपत्रक आणि कामाच्या निकषांनुसार बांधकाम झाले की नाही, याची पडताळणी करून तपासणीत त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे सटाण्याचे उपकार्यकारी अभियंता पी. डी. सोनवणे यांनी सांगितले.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance