नाशिक : हिवाळ्याची चाहूल लागताच बाजारात उबदार कपड्यांची खरेदी वाढली असून, यंदा उबदारपणा आणि स्टाइल यांचा मेळ घालणारे ट्रेंड चर्चेत आहेत. थंडीचा सामना करण्यासाठी बाजारात आलेली झिरो डिग्री जॅकेट्स आणि हेवी इन्सुलेटेड पफर्स तरुणाईचे विशेष लक्ष वेधून घेत आहेत. ही जॅकेट अतिथंडीतही शरीराला उबदार ठेवतात आणि त्याचवेळी कूल व ट्रेंडी लूक देतात.
जॅकेट आणि फूटवेअरची चलती
फूटवेअरच्या बाबतीत यंदा महिला आणि पुरुष दोघांमध्येही चंकी बूट्स, लेदर अँकल बुट्स आणि कॉम्बॅट बुट्सची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. लाँग ओव्हरकोट, बॉम्बर जॅकेट्स आणि बॅगी जीन्ससोबत हे बूट घातल्यास आधुनिक लुक मिळतो. जेन झी वर्गात ओव्हरसाईज्ड विंटेज लेदर जॅकेट्स, ब्राइट निटवेअर आणि फनेल-नेक जॅकेट्सची फॅशन सर्वाधिक पसंतीस उतरत आहे. तरुण पिढी रंगांच्या बाबतीत प्रयोग करताना दिसते; पेस्टल शेड्ससोबत व्हायब्रंट रंगाचे मफलर आणि बीनी कॅप्स त्यांना अधिक भावत आहेत.
महिला आणि पुरुषांसाठी वेगवेगळे पर्याय
महिलांसाठी हिवाळ्यात लाँग वुलन कोट्स, चेक पॅटर्न ओव्हरकोट, टर्टलनेक स्वेटर्स आणि मऊ लेयरिंगचे विविध प्रकार विशेष पसंतीस उतरत आहेत. एथनिक वेअरमध्ये लोकर आणि पश्मिना शालची जादू कायम आहे. दुसरीकडे, पुरुषांसाठी मिनिमलिस्ट जॅकेट्स, लेअर्ड हुडीज आणि ट्रॅडिशनल बॉम्बर जॅकेट्स असे ट्रेंडी आऊटफीट उपलब्ध आहेत.
एकूणच, यंदाची हिवाळी फॅशन कम्फर्ट, उबदारपणा आणि फॅशन यांचे उत्तम संतुलन साधणारी ठरत आहे. प्रत्येक वयोगटातील व्यक्तीसाठी यात काहीतरी खास नवीन प्रयोग पाहायला मिळत आहेत. हातमोजे, मोजे, थर्मल, जॅकेट, कानटोपी, स्कार्फ असे असंख्य प्रकार हिवाळी फॅशनसाठी उपलब्ध झाले असून, दरवर्षी फॅशन ट्रेंडनुसार डिझाइनमध्ये बदल केले जातात.
Leave a Reply