भुसावळ येथील डी. एल. हिंदी हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन नुकतेच पार पडले. तब्बल ५३ वर्षांनंतर सर्व मित्र एकत्र आल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. तत्कालीन शिक्षकांनीही उत्स्फूर्तपणे सहभागी होत विविध क्षेत्रांत कार्यरत व ठिकठिकाणांहून आलेल्या आपल्या माजी विद्यार्थ्यांशी अगदी मनमोकळा संवाद साधला.
तीन बॅचचे विद्यार्थी एकत्र
शैक्षणिक वर्षे १९७३, १९७४ व १९७५ यांतील बॅचचे माजी विद्यार्थी आता वृद्धत्वाकडे झुकलेले होते. मात्र, त्यांचा मित्रांना भेटण्याचा उत्साह दांडगा होता. मित्रांना भेटण्यासाठी ते पुणे, ईटारसी, अहमदाबाद येथून आले होते. वर्गमित्रांना व शिक्षकांना भेटल्यामुळे शाळेच्या आवारात जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
गुरूजनांचा सन्मान
यावेळी आपल्या गुरूजनांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनाही स्मृतिचिन्ह देण्यात आले. हिंदी सेवा मंडळाचे विद्यमान कार्याध्यक्ष सत्यनारायण गोडीयाले या स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. विशेष म्हणजे शाळेचे माजी प्राचार्य बी. एस. चोरडीया, शिक्षक वाय. सी. वारके, ओ. सी. अरोरा हे वयाची ८० वर्षे पार केलेले गुरुजन उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
काही माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात आपले शालेय जीवनातील अनुभव सांगत शाळेने आपल्या जडणघडणीत दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी डॉ. रघुनाथ कश्यप व डॉ. भुवनेशदत्त गौर यांनी सूत्रसंचालन केले. मेळाव्यासाठी अनवर खान, सुरेश साहू, कुंजविहारी रावत व राजकुमार कश्यप यांनी परिश्रम घेतले.
Leave a Reply