श्रीवर्धन : शहराच्या प्रवेशद्वारांवर उपविधी कर वसूल करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता स्वतंत्र गणवेश आणि अधिकृत ओळखपत्र मिळणार आहे. कर भरण्यावरून पर्यटकांशी होणाऱ्या वादाच्या पार्श्वभूमीवर श्रीवर्धन नगर परिषदेने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या समस्येकडे लक्ष वेधणाऱ्या वृत्ताची दखल घेत उपनगराध्यक्ष अनंत गुरव यांनी याबाबत तातडीने निर्देश दिले.
श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याला ब्लू फ्लॅग मानांकन मिळाल्यानंतर शहरात पर्यटकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शहराच्या प्रवेशद्वारांवर पर्यावरण नियंत्रण आणि स्वच्छता कराची वसुली केली जाते. मात्र, काही पर्यटक कर भरण्यास टाळाटाळ करतात आणि त्यातून कर्मचाऱ्यांशी वादाचे प्रसंग घडतात. कर्मचाऱ्यांकडे गणवेश किंवा अधिकृत ओळखपत्र नसल्याने त्यांच्या ओळखीबाबतही संभ्रम निर्माण होत होता.
१४ नोव्हेंबरच्या वृत्तानंतर निर्णय
या समस्येकडे लक्ष वेधणारे वृत्त १४ नोव्हेंबरच्या अंकात प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर नगर परिषदेने कर्मचाऱ्यांची सुरक्षितता आणि करवसुली प्रक्रियेतील पारदर्शकता वाढविण्यासाठी गणवेश व ओळखपत्र देण्याचा निर्णय घेतला. दोन्ही प्रवेशद्वारांवरील कर्मचाऱ्यांना लवकरच गणवेश आणि ओळखपत्र दिले जाणार आहे.
वाद कमी होण्याची अपेक्षा
अधिकृत गणवेश आणि ओळखपत्रामुळे पर्यटकांना करवसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांची ओळख पटण्यास मदत होणार आहे. त्यामुळे गैरसमज आणि वादाचे प्रसंग कमी होण्याची अपेक्षा आहे. तसेच वाहनांच्या रांगा टाळण्यासाठीही या निर्णयाचा उपयोग होऊ शकतो.
प्रसिद्ध झालेल्या बातमीची तातडीने दखल घेतली असून, करवसुली कर्मचाऱ्यांची अधिकृत ओळख स्पष्ट व्हावी आणि पर्यटकांशी होणारे वाद टळावेत, यासाठी त्यांना स्वतंत्र गणवेश व ओळखपत्र देण्याचा निर्णय घेतल्याचे उपनगराध्यक्ष अनंत गुरव यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले.
Leave a Reply