मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमधील वैद्यकीय सुविधांचा विस्तार करण्यासाठी प्रशासनाने सार्वजनिक-खासगी भागीदारीचा मार्ग स्वीकारला आहे. याअंतर्गत सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात अतिरिक्त ड्युअल एनर्जी सीटी स्कॅनची सुविधा सुरू करण्यात येणार आहे, तर धारावीतील अर्बन हेल्थ सेंटर अर्थात छोट्या सायन रुग्णालयात १० मशीनचे डायलिसिस केंद्र उभारण्याचा प्रस्ताव आहे. या दोन्ही सुविधांमुळे रुग्णांना प्रगत तपासण्या आणि उपचार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
सायन रुग्णालयात अतिरिक्त सीटी स्कॅन
सायन रुग्णालयात सध्या ड्युअल एनर्जी सीटी स्कॅनची सुविधा उपलब्ध आहे, मात्र रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ही सुविधा अपुरी पडत असल्याने अतिरिक्त मशीन बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी एजेनेस हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड या खासगी कंपनीची निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत मशीन बसणे, तिची देखभाल आणि दुरुस्ती तसेच आवश्यक डॉक्टर व परिचारिकांची नियुक्ती करण्याची जबाबदारी संबंधित कंपनी पार पाडणार आहे. या बदल्यात कंपनीकडून महापालिकेला दरमहा २ लाख ७० हजार रुपये रॉयल्टी मिळणार आहे. रुग्णांकडून महापालिकेने निश्चित केलेले शुल्कच आकारले जाणार आहे.
धारावीत १० मशीनचे डायलिसिस केंद्र
दुसरीकडे, धारावीतील अर्बन हेल्थ सेंटरमध्ये १० मशीनचे डायलिसिस केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या केंद्रासाठी आवश्यक मशीन सायन रुग्णालयाकडून खरेदी करण्यात येणार आहेत. या केंद्राचे संचालन करण्यासाठी अपेक्स किडनी केअर प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेची नियुक्ती करण्याची शिफारस करण्यात आली आहे. हा प्रस्ताव १८ नोव्हेंबर रोजी सुधार समितीसमोर मांडण्यात येणार आहे. हे डायलिसिस केंद्र सायन रुग्णालयाच्या मूत्रपिंडविकार विभागाच्या देखरेखीखाली चालविण्यात येणार असून, रुग्णांना आवश्यकतेनुसार तेथे उपचारांसाठी पाठविले जाणार आहे.
पात्र रुग्णांना मोफत सुविधा
या डायलिसिस केंद्राचे वैशिष्ट्य म्हणजे पात्र रुग्णांना उपचारांसाठी पैसे मोजावे लागणार नाहीत. आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत संबंधित उपचारांचा खर्च मिळणार आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोफत डायलिसिसची सुविधा उपलब्ध होणार आहे. धारावी परिसरातील रुग्णांना डायलिसिससाठी दूरच्या रुग्णालयांमध्ये जाण्याची गरज कमी होण्यासही मदत होईल.
Leave a Reply