कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी दूध खरेदी दरात वाढ करावी, अशी लेखी मागणी गोकुळ दूध संघाकडे करण्यात आली आहे. समविचारी आघाडीच्या संचालकांनी नूतन संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीत ही मागणी मांडली. एक निवेदन अध्यक्षांना, तर दुसरे कार्यकारी संचालकांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टावर आणि विश्वासावर दूध संघ उभा आहे. शेतकरी हाच संघाचा खरा मालक आणि कणा आहे. सध्या जिल्ह्यासह राज्यात दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे उत्पादकांचा खर्च दिवसेंदिवस वाढत असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. दुसरीकडे बाजारात दूध विक्रीचे दर वाढत आहेत. त्यामुळे खरेदी दरात वाढ करून उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रशासकीय काळातील प्रोसिडिंगची मागणी
दरम्यान, प्रशासकीय कालावधीत दूध संघाला सुमारे २४ कोटी रुपयांचा तोटा झाल्याची माहिती समविचारी आघाडीच्या संचालकांना मिळाली आहे. त्याचबरोबर प्रशासकीय काळातील इतर काही माहितीही त्यांच्या हाती आली आहे. त्यामुळे त्यांनी प्रशासकीय काळातील प्रोसिडिंगच्या प्रमाणित प्रतींची मागणी केली आहे. शासन नियुक्त प्रशासकीय मंडळाच्या कालावधीत झालेल्या सर्व बैठका, त्यामध्ये केलेले ठराव आणि निर्णय, तसेच संबंधित बैठकींच्या प्रोसिडिंगची संपूर्ण माहिती लवकरात लवकर द्यावी, असे दुसऱ्या निवेदनात म्हटले आहे.
तेरा संचालकांच्या सह्या
या निवेदनावर शशिकांत पाटील-चुयेकर, बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, बाबासाहेब देवकर, किसन चौगले, विश्वजित जाधव, राहुल देसाई, विद्याधर गुरबे, अंजना रेडेकर, भाग्यश्री डोंगळे, शशिकांत खोत, राजू आवळे आणि बयाजी शेळके अशा तेरा संचालकांच्या सह्या आहेत.
Leave a Reply