अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत या आठवड्यात फळे आणि भाजीपाल्याची आवक चांगली राहिली. लहान आकाराच्या संत्र्यांची आवक नियमित सुरू असून, या फळांना अपेक्षेपेक्षा कमी दर मिळत असल्याचे चित्र आहे. त्याचवेळी लिंबाच्या मागणीत वाढ झाल्याने त्याचे दर सुधारले आहेत. मोसंबी, डाळिंब, पपई, आवळा आणि सीताफळाची आवकही लक्षणीय नोंदवण्यात आली.
बाजार समितीत लहान आकाराच्या संत्र्यांची आवक १८७ क्विंटलवर पोहोचली. या संत्र्यांना प्रतिक्विंटल २,००० ते ४,००० रुपये दर मिळाला. ही फळे प्रक्रियेसाठी फारशी उपयुक्त ठरत नसल्याने त्यांची विक्री मर्यादित दरात करावी लागत आहे. संत्रा उत्पादकांसाठी मोठ्या आकाराच्या फळांना अपेक्षित दर मिळणे महत्त्वाचे असताना, लहान फळांची ही स्थिती शेतकऱ्यांसाठी चिंतेची ठरत आहे.
फळांचे दर कसे राहिले
लिंबाची मागणी वाढल्याने त्याच्या दराला आधार मिळाला. लिंबाची ३८ क्विंटल आवक झाली असून, प्रतिक्विंटल ६,००० ते ७,००० रुपये दराने व्यवहार झाले. फळांमध्ये मोसंबीची सर्वाधिक ३५७ क्विंटल आवक नोंदवण्यात आली. मोसंबीला १,५०० ते ३,००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. डाळिंबाची ६८ क्विंटल आवक होऊन १२,००० ते १४,००० रुपये दराने व्यवहार झाले. तैवान पपईची १४३ क्विंटल आवक झाली आणि तिला २,५०० ते ३,००० रुपये दर मिळाला. आवळ्याची १३६ क्विंटल आवक होऊन १,५०० ते ३,००० रुपये दर राहिला.
सीताफळाच्या हंगामाला आता वेग येत असल्याचे आवकेवरून स्पष्ट होत आहे. गेल्या आठवड्यात अवघी ६०० क्विंटल असलेली सीताफळाची आवक या आठवड्यात वाढून ७८९ क्विंटलवर पोहोचली. सीताफळाला प्रतिक्विंटल २,००० ते ५,००० रुपये दर मिळाला. हिरव्या हरभऱ्याचीही ९५० क्विंटल आवक झाली असून, १,५४० ते २,००० रुपये प्रतिक्विंटल दराने व्यवहार झाले.
भाजीपाल्याचे दर
भाजीपाला बाजारात नाशिक कांद्याची २७३ क्विंटल आवक झाली. कांद्याला ३,५०० ते ४,५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. बटाट्याची ५५० क्विंटल आवक होऊन ७०० ते १,४०० रुपये दराने व्यवहार झाले. लसणाचे दर मात्र तुलनेने टिकून आहेत. लसणाची ११२ क्विंटल आवक झाली असून, ७,००० ते १७,००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. आल्याची ८३ क्विंटल आवक झाली आणि त्याला ५,००० ते ७,००० रुपये दर मिळाला. टोमॅटोची २५३ क्विंटल आवक होऊन १,००० ते २,००० रुपये दर राहिला.
वांगी १३२ क्विंटल, कारले ६८ क्विंटल, बरबटी ५० क्विंटल आणि ढेमसे ४८ क्विंटल अशी आवक झाली. कारल्याला २,६०० ते ३,२०० रुपये, तर बरबटी आणि ढेमशाला २,५०० ते ३,००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. वांग्याचे दर १,२०० ते २,२०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. कारल्याची आवक तुलनेने कमी असल्याने त्याच्या दराला आधार मिळत असल्याचे बाजारातील चित्र आहे.
हिरव्या भाजीपाल्यात मेथी, पालक आणि कोथिंबिरीचे व्यवहार सुरू आहेत. पालकाला ८०० ते १,४०० रुपये, तर मेथीला १,५०० ते ३,००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. कोथिंबिरीची १४५ क्विंटल आवक होऊन १,५०० ते २,५०० रुपये दर राहिला. काकडीची ७८ क्विंटल आवक झाली असून, २,००० ते २,५०० रुपये दर मिळाला. हिरव्या मिरचीची ११० क्विंटल आवक होऊन ३,२०० ते ४,२०० रुपये प्रतिक्विंटल दराने व्यवहार झाले. ढोबळी मिरचीची आवक मात्र अवघी नऊ क्विंटल राहिली आणि तिला २,५०० ते ३,००० रुपये दर मिळाला. भेंडीची ७४ क्विंटल आवक होऊन २,६०० ते ३,२०० रुपये दर मिळाला. गाजराची ५० क्विंटल आवक झाली असून, २,५०० ते ३,००० रुपये प्रतिक्विंटल दराने व्यवहार झाले.
एकूणच, अमरावतीच्या फळ-भाजीपाला बाजारात हंगामी फळांची आवक वाढत असताना लिंबू, लसूण, हिरवी मिरची आणि कारल्याला तुलनेने चांगले दर मिळत आहेत. आवक, मागणी आणि हंगामी उपलब्धता यांनुसार विविध शेतमालाच्या दरांमध्ये चढ-उतार होत असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.
Leave a Reply