बीड जिल्ह्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर येत्या डिसेंबर महिन्यात सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाकडून १४, १५, ३० आणि ३१ डिसेंबर २०२६ या चार दिवशी हे सोहळे पार पडणार आहेत. लग्नातील अनावश्यक खर्च टाळून सामूहिक विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाकडून नवदांपत्यांना २५ हजार रुपयांचे अनुदान दिले जाते.
जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी या सोहळ्यात आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास घटक, ऊसतोड कामगार, वीटभट्टी मजूर आणि लग्नाचा खर्च पेलू न शकणाऱ्या गरजू कुटुंबांना प्रामुख्याने सामावून घ्यावे, असे निर्देश दिले आहेत.
आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान, समाज कल्याणचे सहायक आयुक्त प्रदीप भोगले, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एफ. एम. शेख, जिल्हा कार्यक्रम अधिकारी कालिदास बडे, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक केदार गरड यांच्यासह संबंधित यंत्रणेचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, इतर मागास बहुजन कल्याण विभाग आणि महिला व बालविकास विभागामार्फत हे अनुदान दिले जाते. योजनेचा लाभ खऱ्या गरजूपर्यंत पोहोचवण्यासाठी या विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष गाव, वाडी, वस्ती आणि तांड्यावर भेटी देऊन डिसेंबर महिन्यात विवाह करू इच्छिणाऱ्यांची माहिती संकलित करावी. या उपक्रमाची गावागावात जनजागृती करण्याची जबाबदारी तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. गावातील इच्छुक लाभार्थ्यांचे अर्ज जमा करण्यासाठी अंगणवाडी सेविकांची संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Leave a Reply