पाण्याची टंचाई आणि सिंचनाच्या अनिश्चिततेमुळे यंदा केळी लागवडीला मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत. केळीच्या टिशू कल्चर रोपांची मागणी तब्बल ९० टक्क्यांनी घटली असून, रोपांच्या किमतीतही २५ टक्क्यांची घसरण झाली आहे. पाण्याची उपलब्धता पाहूनच शेतकरी आता लागवडीचा निर्णय घेत आहेत.
चांगला बाजारभाव आणि फळबाग लागवडीसाठी मिळणारे अनुदान यामुळे अनेक शेतकरी केळीकडे वळले होते. प्रारंभी केळीला प्रतिकिलो १५ रुपये दर मिळत असल्याने शेतकरी पावसाळ्यापूर्वीच टिशू कल्चर रोपांची नोंदणी करीत होते. मात्र, यंदा पाण्याची स्थिती पाहता रोपांची नोंदणीच थांबल्यासारखी झाली आहे.
गतवर्षीच्या तुलनेत मोठी घसरण
गतवर्षी पाथ्रोट गावाच्या परिसरात सुमारे दोन लाख रोपांचा पुरवठा झाला होता. यंदा मात्र ही संख्या अवघ्या तीन हजारांवर आली आहे. रोपांची मागणी घटल्याने उत्पादक कंपन्यांनाही दर कमी करावे लागले आहेत. गतवर्षी १७ रुपये प्रतिनग दराने रोपांची बुकिंग होत होती. यंदा त्यात २५ टक्क्यांची कपात झाली आहे.
मागील वर्षी रोपांची आगाऊ नोंदणी करूनही वेळेवर रोपे मिळत नव्हती. यंदा मात्र मागणीअभावी रोपांचा साठा उपलब्ध आहे. एका खासगी टिशू कल्चर कंपनीचे क्षेत्र व्यवस्थापक अनिल माकोडे यांच्या माहितीनुसार, मागील वर्षी मराठवाड्यात ७८ लाख रोपांचा पुरवठा झाला होता. यंदा केवळ ६० ते ७० हजार रोपांची नोंदणी झाली आहे.
लागवड करणाऱ्यांसाठी सवलत
३१ डिसेंबरपर्यंत लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कंपनीने रोपांच्या किमतीत २५ टक्के सवलत दिली आहे. योग्य पाण्याचे नियोजन असलेल्या शेतकऱ्यांनी एक ते दोन हजार रोपांची लागवड केल्यास केळीला प्रतिक्विंटल २,५०० ते ३,२०० रुपये दर मिळण्याची शक्यता माकोडे यांनी व्यक्त केली.
दरम्यान, बऱ्हाणपूर येथील बाजारभावाच्या आधारे अंजनगावसुर्जी तालुक्यातील पांढरी येथून दररोज केळीचे दर जाहीर केले जात होते. मात्र, व्यापाऱ्यांनी दरफलक लावण्याबाबत पुढाकार न घेतल्याने ही अनेक वर्षांची परंपरा बंद पडली आहे. परिणामी, विक्रीच्या वेळी योग्य दराचा अंदाज घेणे शेतकऱ्यांना कठीण झाले आहे.
Leave a Reply