हिंगोली येथे झालेल्या १४ वर्षांखालील विभागीय शालेय कबड्डी स्पर्धेत तेथील जिल्हा संघातील काही खेळाडूंनी बनावट कागदपत्रांच्या आधारे वय कमी दाखवून सहभाग घेतल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून सर्व संशयित खेळाडूंची वैद्यकीय वय पडताळणी चाचणी घ्यावी, अशी मागणी पैठणच्या भीमाशंकर विद्यालयाचे सहशिक्षक एस. के. बदर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
शालेय क्रीडा स्पर्धांतर्गत ही विभागीय स्पर्धा २६ व २७ ऑक्टोबर रोजी डिग्रस फाटा, हिंगोली येथे पार पडली. संबंधित खेळाडूंचे वय कमी दाखवण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. डीएसओ पोर्टलवरील नोंदी व पुरावे क्रीडा उपसंचालक, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे सादर करण्यात आले आहेत. गैरप्रकार सिद्ध झाल्यास संबंधित शाळा व क्रीडा शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून, या निवेदनाच्या प्रती क्रीडा संचालनालय, पुणे येथेही पाठवण्यात आल्या आहेत.
पात्र खेळाडूंवर अन्याय होत असल्याचा आरोप
वयोमर्यादेचे उल्लंघन करून अधिक वयाचे खेळाडू खेळवणे हा पात्र व होतकरू खेळाडूंवर घोर अन्याय असल्याचे बदर यांनी म्हटले आहे. या प्रकरणाची निष्पक्ष तपासणी करून खऱ्या खेळाडूंना न्याय द्यावा, अशी त्यांची मागणी आहे.
दरम्यान, केवळ शाळेच्या प्रतिष्ठेसाठी मुख्याध्यापक व शिक्षकांनी अशा बोगस खेळाडूंना मैदानात उतरवू नये, असे पालक स्वप्नील चाळक यांनी म्हटले आहे. क्रीडा विभागाने न्याय दिला नाही, तर न्यायालयात कायदेशीर लढा दिला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
Leave a Reply