राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अनेक बसगाड्यांचे हेडलाईट मंद प्रकाश देत असल्याने रात्रीचा प्रवास धोकादायक बनला आहे. रस्त्यावरील खड्डे, वळणे, समोरून येणारी वाहने आणि रस्त्याच्या कडेचे अडथळे स्पष्ट दिसत नसल्याने चालकांना बस चालवताना मोठी अडचण येत असून अपघाताचा धोका वाढला आहे.
मुखेड आगाराची सोलापूर-मुखेड बस पाच नोव्हेंबर रोजी रात्री मुखेडकडे जात होती. त्यावेळी बसच्या हेडलाईटचा प्रकाश अत्यंत मंद असल्याचे लक्षात आले. ग्रामीण भागातील अंधाऱ्या रस्त्यांवर अशा सदोष प्रकाशयंत्रणेमुळे प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो, ही बाब समोर आली आहे.
ग्रामीण रस्त्यांवर अधिक धोका
ग्रामीण भागात रस्त्यांवर पुरेसा प्रकाश नसतो. अशा ठिकाणी बसच्या हेडलाईटचा प्रकाशच चालकाचा एकमेव आधार असतो. प्रकाश मंद असेल तर समोरचा रस्ता, वळणे किंवा अडथळे वेळेत दिसत नाहीत. त्यामुळे चालकाला अचानक ब्रेक लावावा लागतो किंवा बस वळवावी लागते. अशा परिस्थितीत मोठा अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे रात्रीच्या फेऱ्यांपूर्वी प्रकाशयंत्रणेची खात्री करणे अत्यंत गरजेचे आहे.
तपासणीची मागणी
या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या जळकोट तालुका शाखेच्या वतीने नांदेड विभाग नियंत्रकांकडे निवेदन देण्यात आले. दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा आधीच खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सर्व एसटी बसगाड्यांच्या हेडलाईटची तातडीने तपासणी करावी, मंद प्रकाश असलेले हेडलाईट बदलावेत आणि प्रत्येक रात्रीच्या फेरीपूर्वी प्रकाशयंत्रणेची खात्री करूनच गाड्या सेवेत पाठवाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. चालक आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी एसटी प्रशासनाने यावर तत्काळ कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
Leave a Reply