महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात १३ हजार ९८० कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय परिवहन मंत्र्यांनी एकतर्फी घेतल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेने केला आहे. हा निर्णय तातडीने रद्द करावा, अशी संघटनेची मागणी आहे.
दिवाळीनंतर एसटी कर्मचारी संघटनांसोबत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही कंत्राटी भरतीचा निर्णय घेतल्याने संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हा निर्णय तातडीने रद्द न केल्यास राज्यव्यापी आंदोलनासह न्यायालयीन लढा उभारण्याचा इशारा संघटनेचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी दिला आहे.
इंटकची भूमिका काय
एसटी महामंडळात मोठ्या प्रमाणावर कंत्राटी कर्मचारी भरती केल्यास महामंडळाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते, अशी भूमिका इंटकने मांडली आहे. तसेच सध्या कार्यरत असलेल्या नियमित कर्मचाऱ्यांच्या नोकरीच्या भवितव्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. कंत्राटी पद्धतीमुळे कर्मचाऱ्यांच्या सेवा अटी, कामाची गुणवत्ता आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबतही गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतात, असे संघटनेचे म्हणणे आहे.
दिवाळीनंतर संघटनांसोबत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन परिवहन मंत्र्यांनी दिले होते. मात्र, संघटनांना विश्वासात न घेता १३ हजार ९८० कर्मचाऱ्यांची कंत्राटी भरती करण्याचा एकतर्फी निर्णय घेतला. हा निर्णय एसटी महामंडळ, नियमित कर्मचारी आणि प्रवाशांच्या हिताचा नाही. त्यामुळे कंत्राटी भरतीचा निर्णय तातडीने रद्द करून महामंडळानेच कायमस्वरूपी भरती करावी, अशी मागणी तिगोटे यांनी केली आहे.
Leave a Reply