छत्रपती संभाजीनगरमध्ये दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण कल्याणासाठी महापालिकेने हडको एन-१२ येथे १.६७ एकर जागेत दिव्यांग भवनाचे काम हाती घेतले आहे. पहिल्या टप्प्यातील काम पूर्णत्वाकडे जात असताना पुढील दोन टप्प्यांचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. या प्रस्तावानुसार भवनाचा एकूण खर्च २० कोटी २ लाख १८ हजार ६०७ रुपयांवर जाणार आहे.
शहरातील दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी अर्थसंकल्पात निधी राखीव ठेवण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने दिव्यांगांसाठी उदरनिर्वाह भत्ताही सुरू केला आहे. हडको एन-१२ येथे दिव्यांग भवन बांधण्याचा निर्णय तत्कालीन प्रशासक जी. श्रीकांत यांनी घेतला होता. या इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत टप्पा दोन व टप्पा तीनचा प्रस्ताव सादर करण्यात आला.
तीन टप्प्यांत कोणत्या सुविधा मिळणार
पहिल्या टप्प्यात बहुविकलांग उपचार, मूल्यमापन आणि पुनर्वसन केंद्र, वाचा-भाषा उपचार, मानसशास्त्रीय उपचार, ऑडिओलॉजी, बालन्यूरोलॉजी तसेच पालकांसाठी समुपदेशन यासह आवश्यक सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
दुसऱ्या टप्प्यात विशेष शाळा, विशेष शिक्षण, वैयक्तिक शिक्षण, हायड्रोथेरपी युनिट, जीवन कौशल्य प्रशिक्षण, उपाहारगृह तसेच शैक्षणिक व पुनर्वसनात्मक सेवा उभारल्या जाणार आहेत. तिसऱ्या टप्प्यात सेन्सरी पार्क, निवासी व सहाय्य सुविधा, व्यावासायिक प्रशिक्षण तसेच पुनर्वसन, स्वावलंबन कौशल्य विकास आणि सामाजिक विकासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.
भवन कोण चालवणार
महापालिकेकडे सध्या भवन चालविण्यासाठी आवश्यक तज्ज्ञ व तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध नाही. त्यामुळे तांत्रिक मनुष्यबळ व सेवा उपलब्ध करून देण्यासाठी इच्छुक अनुभवी संस्थांकडून प्रस्ताव मागवले जाणार आहेत. प्रस्ताव आल्यानंतर योग्य संस्थेची दहा वर्षांसाठी निवड केली जाईल, असे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.
Leave a Reply