पाथरी तालुक्यात वाळू उत्खननातून मिळणारा पैसा पाहून गावातील लहान मुले, विद्यार्थी आणि तरुण मोठ्या प्रमाणात या व्यवसायाकडे आकर्षित होत असल्याचे चित्र समोर येत आहे. विशेष म्हणजे, कोणतेही भांडवल किंवा मोठी गुंतवणूक नसतानाही वाळूच्या धंद्यातून झटपट पैसा मिळतो, अशी धारणा तरुणांत निर्माण होत आहे. त्यामुळे शिक्षण, मेहनत आणि रोजगाराच्या पारंपरिक मार्गापासून तरुण पिढी दूर जाण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
झटपट पैशाची धारणा आणि शिक्षणापासून दुरावा
तालुक्यात गोदापट्ट्यात वाळू उत्खननाच्या गोरखधंद्यातून अल्पावधीत मोठा पैसा मिळत असल्याचे चित्र लहान मुलांसमोर आणि विद्यार्थ्यांसमोर उभे राहत आहे. परिणामी अभ्यास करून भविष्य घडविण्यापेक्षा वाळूच्या व्यवसायात उतरून पैसा कमावण्याची मानसिकता काही तरुणांमध्ये वाढीस लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकाराचा परिणाम केवळ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनावरच नव्हे, तर गावाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरणावरही होऊ शकतो. कष्ट, शिक्षण, प्रामाणिकपणा आणि सामाजिक प्रतिष्ठा या मूल्यांऐवजी कमी कालावधीत आणि अल्प श्रमातून येणाऱ्या पैशाला अधिक महत्त्व मिळू लागल्यास ग्रामीण संस्कृतीसमोर नवे आव्हान उभे राहू शकते.
गावच्या संस्कृतीसमोर नवे आव्हान
वाळू उत्खननाच्या व्यवसायात नियमांचे पालन, पर्यावरणाचे संरक्षण आणि कायदेशीर बाबी महत्त्वाच्या असताना या व्यवसायाकडे तरुणांचा वाढता कल चिंतेचा विषय ठरत आहे. लहान वयातच पैशाचे आकर्षण निर्माण होऊन विद्यार्थी शिक्षणापासून भरकटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासन, महसूल विभाग, पोलिस यंत्रणा, ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांनी वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. बेकायदेशीर वाळू उत्खनन आणि वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासोबतच विद्यार्थ्यांत शिक्षणाचे महत्त्व आणि योग्य रोजगाराची जाणीव निर्माण करणे आवश्यक आहे. आज वाळूच्या पैशाचे आकर्षण रोखले नाही, तर उद्याची पिढी शिक्षणाऐवजी झटपट पैशाच्या मागे धावण्याची भीती आहे. त्यामुळे वाळू उत्खननाचा प्रश्न हा केवळ पर्यावरणाचा किंवा महसुलाचा नसून गावाच्या भावी पिढीच्या भविष्याचा आणि संस्कृतीचा प्रश्न बनत आहे. वाळू व्यवसायातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक उत्पन्न होत असल्याने या व्यवसायात गुंतलेल्या तरुणांत गुन्हेगारी प्रवृत्ती बळावत असल्याचेही समोर आले आहे. गेल्या काही वर्षांत पाथरी पोलिसांत तीस ते पस्तीस वर्षांच्या अनेक तरुणांवर हल्ला करणे, जीवघेणा हल्ला करणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे आदी गुन्हे नोंद झाले असून हे गुन्हे कमी होण्याऐवजी वाढत आहेत.
Leave a Reply