रविवार, १५ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

सिन्नरमध्ये कचऱ्याचे ३७ ब्लॅकस्पॉट; संकलनाचा प्रश्न ऐरणीवर

सिन्नर शहर आणि उपनगरांत कचऱ्याचे तब्बल ३७ ब्लॅकस्पॉट आढळले आहेत. घंटागाड्यांची कमतरता आणि वेळेचा अडथळा यामुळे कचरा संकलनाचा प्रश्न गंभीर बनला आहे.

सिन्नरमध्ये कचऱ्याचे ३७ ब्लॅकस्पॉट; संकलनाचा प्रश्न ऐरणीवर

सिन्नर शहरात कचरा संकलनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहर आणि उपनगरांत कचऱ्याचे तब्बल ३७ ब्लॅकस्पॉट आढळून आले आहेत. एकूण ३७ ठिकाणी कचरा उचलला जात नसून नागरिकही बेफिकिरीने तेथे कचरा टाकत असल्याचे एका पाहणीत निष्पन्न झाले आहे. सरदवाडी पुलाजवळ कचऱ्याचा सर्वात मोठा ब्लॅकस्पॉट आहे.

ब्लॅकस्पॉट का वाढले?

शहराचा विस्तार वाढल्याने कचरा संकलनाचे आव्हान प्रशासनासमोर उभे आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्याच्या कार्यक्रमात ब्लॅकस्पॉटचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर नगरसेवक आणि प्रशासनाने मिळून ब्लॅकस्पॉटचा शोध घेतला. यात शहरात दोन तर उपनगरांत तब्बल ३५ ब्लॅकस्पॉट आढळले. त्यामुळे उपनगरांतील कचरा संकलनाचा मुद्दा प्राधान्याने समोर आला आहे.

नगरपालिकेकडे घंटागाड्यांची संख्या अजूनही पुरेशी नाही. घंटागाड्या कमी असल्याने ठराविक क्षेत्रात त्या वेळेत पोहोचत नाहीत. संकलनासाठी सकाळची वेळ महत्त्वाची असली तरी वाहने दुपारी दोन वाजता येत असल्याने नागरिकांसाठी ही वेळ गैरसोयीची ठरते. त्यामुळे पुरेसे संकलन होत नाही. इमारतीत राहणारे अनेक नागरिक घंटागाडी येऊनही कचरा टाकण्यासाठी खाली उतरत नाहीत. रात्री बाहेर फिरायला निघतानाच कचरा ब्लॅकस्पॉटवर फेकण्याची सवयही अनेकांना आहे.

प्रशासकीय निकष आणि उपाययोजना

नगरपरिषद क्षेत्रात दरडोई दररोज प्रति व्यक्ती किमान ३०० ते ४०० ग्रॅम कचरा निर्माण होण्याचा अंदाज आहे. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत घरांतून दररोज कचरा उचलणे बंधनकारक आहे. एका प्रभागात किमान पाच ते साडेसात हजार लोकसंख्येमागे एक घंटागाडी असणे आवश्यक आहे. दाट लोकवस्ती आणि अरुंद गल्लीत किमान तीन ते चार हजार लोकसंख्येमागे घंटागाडी असावी.

नगराध्यक्ष विठ्ठल उगले, उपनगराध्यक्ष हर्षद देशमुख, मुख्याधिकारी अभिजित कदम आणि आरोग्य सभापती ललिता हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने नादुरुस्त तीन वाहने दुरुस्त केली आहेत. नव्याने तीन वाहने अशी एकूण पाच वाहने कचरा संकलनासाठी ताफ्यात आणली आहेत. त्यामुळे पाच ठिकाणचे ब्लॅकस्पॉट निर्मूलन करण्यात यश आले आहे. आणखीही काही वाहने ताफ्यात येणार आहेत. सिन्नरमध्ये एकूण २८ हजार मालमत्ता असून लोकसंख्या एक लाख आहे.

आरोग्य निरीक्षक सायली बाविस्कर यांनी सांगितले की, नुकत्याच केलेल्या पाहणीनुसार ब्लॅकस्पॉट शोधले आहेत. संबंधित ठिकाणी कचरा न टाकण्याबाबत नोटिसा लावल्या आहेत. वाहनांची संख्या वाढवून झिरो ब्लॅकस्पॉटचे नियोजन सुरू आहे. नागरिकांनीही आपली जबाबदारी म्हणून शहर स्वच्छ ठेवण्यास मदत करावी आणि इतरत्र कुठेही कचरा टाकू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance